
अमळनेर:- संपूर्ण अमळनेर तालुक्याची खरीप पिकाची सुधारित पैसेवारी ५० टक्केच्या आत असल्याचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी जाहीर केले आहे.

अमळनेर तालुक्यात अमळनेर, वावडे, भरवस, शिरूड, अमळगाव, पातोंडा, मारवड, नगाव हे आठ मंडळे असून १५४ गावे आहेत त्यापैकी धुरखेडा उजाड गाव आहे. ११९ ग्रामपंचायती आहेत. तालुक्यातील प्रमुख ज्वारी, बाजरी आणि कपाशी या तीन पिकांची सुधारित पैसेवारी काढण्यात आली आहे. प्रत्येक गावाची पैसेवारी ४५ ते ४८ टक्क्यांच्या दरम्यान म्हणजे ५० टक्क्यांच्या आत आहे.
तालुक्यात सुरुवातीला जून महिन्यात पाऊसच पडला नाही. आणि नंतर अनियमित अतिवृष्टी झाल्याने जेमतेम आलेले पीक ही हातचे गेले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र पैसेवारी जर ५० टक्याच्या वर गेली तर शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीत.
अमळनेर तालुक्याची पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत आल्याने शेतकऱयांचा मुलांना फी माफी, शासनाचे अनुदान, जनावरांना चारा, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, विविध रोजगार हमीची कामे, तलावातील गाळ काढणे, आदींसाठी निधी आणि मदत मिळू शकते.




