नंदुरबारचे पालकमंत्री अनिल पाटील यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सूचना…
नंदुरबार:- जिल्ह्यातील शहादा साखर कारखान्याकडे असंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकल्याने ते शेतकरी संकटात असून या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहेच आपणही पालकमंत्री या नात्याने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, अश्या सूचना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केल्याची माहिती मदत व पुनर्वसन तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अनिल पाटील यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना ना.अनिल पाटील यांनी सांगितले की, शहादा साखर कारखान्याच्या मालकाने असंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या आठ ते दहा महिन्यापासून पैसे थकवले असून अनेकदा मागणी व आंदोलने करून देखील कारखाना मालक पैसे देण्यास धजावत नाही, यासंदर्भात मेघाताई पाटकर यांनी शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन देखील केले परंतु तरीही शेतकऱ्यांना न्याय काही मिळत नाही, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर ज्यावेळी मी तेथे गेलो तेव्हा मला शेतकऱ्यांच्या खऱ्या व्यथा कळल्या असून अतिशय मेहनतीने उत्पादित केलेल्या मालाचे पैसे न मिळणे हा मोठा अन्याय त्यांच्यावर आहे. कदाचित कारखाना मालकाची पैसे देण्याची नैतिकताच नाही हे स्पष्ट दिसत आहे. नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हे माझे कर्तव्य असल्याने मी यात लक्ष घातले असून याबाबत सुरवातीला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि साखर आयुक्तांसोबत बैठक घेऊन चर्चा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाची कल्पना दिली, या कारखान्यातील कामगारांचेही पगार ही रखडले असून शेतकऱ्यांनाही त्यांचे हक्काचे पैसे मिळत नाहीत, प्रत्यक्षात दिलेल्या मालाचा भाव किती हे देखील कारखानदार स्पष्ट करीत नाही, वारंवार फक्त आश्वासन देऊन तेवढा वेळ काढला जातो, पैसे काही दिले जात नाहीत,खरे पाहता १५ दिवसांच्या वर पैसे देण्यास उशीर झाल्यास शेतकऱ्यांना आता व्यजासह त्यांचे पैसे मिळाले पाहिजेत आणि त्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे हे त्यांच्या लक्षात आणून देत तसा आग्रह देखील धरला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दोघांनीही हा विषय गांभीर्याने एकूण घेत सरकार १०० टक्के त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले आणि आपण शेतकऱ्यांना धीर देत त्यांच्या सोबत राहावे अश्या सूचनाही दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कारखाना मालकाने लवकर शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यास त्यांच्यावर निश्चितपणे गुन्हे दाखल होणार, असा स्पष्ट इशारा अनिल पाटील यांनी देत जोपर्यंत शेतकऱ्यांची पै न पै मिळत नाही तोपर्यंत कारखाना सुरू करण्यास परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री व साखर आयुक्तांकडे केली असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.