जानवेजवळ अपघातात एक ठार, दोन महिला झाल्या जखमी…
अमळनेर:- भरधाव वेगाने चारचाकी चालवून पुलाच्या कठड्याला ठोकली गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक ११ रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास जानवे गावाजवळ घडली.
भगवान दलपत सपकाळे (वय ६३) रा गिरणा पंपिंग जवळ जळगाव हे विजया भगवान कोळी (वय ५५) आणि कुंतला भगवान कोळी (वय २४) यांना चारचाकी क्रमांक एमएच १९ एएक्स ६४५३ वर अमळनेरहून धुळ्याकडे जात असताना हयगय न करता वेगाने वाहन चालवत होते. जानवे गावाजवळ हॉटेल फाल्गुनीच्या जवळ पुलाच्या कठड्याला चारचाकी धडकल्याने चारचाकी पलटी होऊन भगवान सपकाळे जागीच ठार झाले. तर विजया आणि कुंतला कोळी दोन्ही गंभीर जखमी झाले. परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेने त्यांना उपचारासाठी धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनेचे वृत्त कळताच सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे व हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस पाटील विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून मयत भगवान सपकाळे यांच्याविरुद्ध स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत व दोघांना जखमी करण्यास कारणीभूत ठरले म्हणून अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहेत.