चौघांविरुद्ध अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल…
अमळनेर:- अवैध वाळूचे वाहन पकडल्याने एका तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करून इतरांना मारहाण करणाऱ्या चौघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा व महसूल कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलाठी संदीप शिंदे, योगेश पाटील, प्रकाश महाजन, मधुकर पाटील या चौघांचे पथक १९ रोजी सकाळी पातोंडा, दहिवद परिसरात गस्त घालत असताना त्यांना नांद्री गावाकडून दहिवदकडे एक निळ्या रंगाचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर येताना दिसले. ट्रॅक्टर अडवून त्यांनी चालक योगेश संतोष पाटील याला ट्रॅक्टर थांबवून पोलीस स्टेशनला नेण्यास सांगितले असता चालकाने नकार देऊन शिवीगाळ सुरू केली. व तलाठ्यांना मारायला माणसे आणतो असे सांगून ट्रॅक्टर सोडून पळून गेला. थोड्या वेळात भूषण उर्फ सोनू देवरे व चालक योगेश हे दोघे मोटरसायकल क्रमांक एम एच १९ डी एम ५२८ वर आले आणि इतर दोन अनोळखी मोटरसायकल क्रमांक एम एच २१ बी २९९२ वर आले आणि आणि तलाठी पथकाला मारू लागले. संदीप शिंदे याला खाली पाडून भूषण उर्फ सोनू याने चालक योगेश याला सांगितले की घालून मारून टाका, योगेशने ट्रॅक्टर चालू केले तेवढ्यात इतर तलाठ्यांनी संदीप शिंदे यांना बाजूला ओढून वाचवले. लागलीच भूषण व इतरांनी तलाठी पथकाच्याच काठ्या हिसकावून पथकाला मारहाण सुरू केली. मारहाणीत शिंदे याला मांडीला व गुढघ्याला तसेच हाताच्या अंगठ्याला मार लागला तर प्रकाश महाजन याना दोघे पायाला व डोक्याला मार लागला. घाबरून तलाठ्यांनी पोलिसांना बोलावले असता चारही जण पळून गेले. वाळू चोरांचे ट्रॅक्टर व गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही मोटरसायकल व वाळू असा एकूण ३ लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तलाठी शिंदे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भूषण उर्फ सोनू देवरे, चालक योगेश संतोष पाटील व दोन अनोळखी अशा चार जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा, जीवे मारण्याचा प्रयत्न, चोरी आणि जमीन महसूल व पर्यावरण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.