2 कोटी निधीतून होणार रस्ते, ग्रामीण दळणवळणास गती देण्याचा प्रयत्न…
अमळनेर:- मतदारसंघातील ग्रामीण भागात दळणवळणास गती मिळून शेतकरी बांधवाना शेतीपूरक व्यवसाय करण्यास चालना मिळावी यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.पाटील यांनी ग्रामिण भागाच्या रास्ता निर्मितीकडे लक्ष केंद्रित केले असून त्यांच्या प्रयत्नांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चार महत्वपूर्ण रस्त्यांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
सुमारे 2 कोटी निधीतून सदर रस्ते होणार असल्याची माहितीही मंत्री पाटील यांनी दिली.याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा शासन आदेश नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी लेखशीर्ष 3054- 2419 रस्ते व पूल दुरुस्ती परिरक्षण कार्यक्रम अंतर्गत गट ब व गट क मधील मंजूर कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यात अमळनेर मतदारसंघातील चार रस्त्यांचा समावेश आहे.
हे चार रस्ते होणार नवीन…
सदर मंजुरी अंतर्गत पातोंडा ते जळोद रस्ता, सा. क्र.0/00 ते 2/00 अंदाजित किंमत 25 लक्ष, अमळगाव ते पातोंडा रस्ता,सा. क्र.5/00 ते 8/00,मंगरूळ ते फाफोरे रस्ता,सा. क्र.2/00 ते 4/00 आणि पारोळा तालुक्यातील रा.मा.6 ते उत्राड हीरपूर रस्ता, सा. क्र.1/00 ते 3/00 आदी चार रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
सदरचे चारही रस्ते शॉर्टकट मार्ग म्हणून प्रचलित असून अनेक वर्षांपासून या रस्त्यांची दुरावस्था झाल्याने लोकांना पर्यायी रस्ता म्हणून फेऱ्याने जावे लागत होते. मात्र मंत्री पाटील यांनी लोकांचा त्रास लक्ष्यात घेऊन सदर रस्ते मंजूर करून आणले आहेत.या रस्त्यामुळे बोरी काठ तसेच जळोद व अमळगाव परिसरातील गावांना चोपड्याकडे गतीने जाता येणार असून यामुळे अमळनेर, चोपडा व धरणगाव या तीन तालुक्याच्या बाजारपेठेशी त्यांचा संपर्क गतिमान होणार आहे. याशिवाय मंगरूळ परिसरातील गावांना फाफोरे,बहादरपूर कडे जाणारा शॉर्टकट मार्ग गतिमान होणार आहे.शिरपूर जवळील नवीन रस्ताही अनेक गावांसाठी वरदान ठरणार आहे.
सदर मंजुरी बद्दल नामदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना अजित पवार, ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन व पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.