तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींची ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी होणार पहिली सभा…
अमळनेर:- नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील १६७ ग्रामपंचायतीच्या पहिली सभा व उपसरपंचांची निवड ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारींनी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सभा व त्याच दिवशी उपसरपंचांची निवड लोकनियुक्त सरपंचाच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. सदस्यांना अजेंडा देण्याचा दिवस व प्रत्यक्ष विशेष सभेचा दिवस वगळून त्यामध्ये तीन दिवसांचा कालावधी असेल इतक्या अगोदर सभेचा अजेंडा दिला पाहिजे. अजेंडा देण्यासाठी ग्रामसेवकाना नियुक्त करण्यात आले आहे. दोन ग्रामपंचायतींचा कारभार एक ग्रामसेवक सांभाळत असेल तर दुसऱ्या ठिकाणी विस्तार अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे. तसेच सभेसाठी एक द्वितीयांश सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे. सभेचा कोरम पूर्ण न झाल्यास नियम ११ प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबर रोजी जेव्हा निवडणूक असेल त्यादिवशी १० ते १२ वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर छाननी करण्यात येईल. दुपारी दोन वाजेला विशेष सभा होणार आहे. सदस्यांनी गोपनीय मतदानाची मागणी केल्यास गोपनीय पद्धतीने मतदान होईल अन्यथा हात उंचावून मतदान होणार आहे.
अमळनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींपैकी शिरसाळे बुद्रुक, पिंपळे बुद्रुक, सडावण बुद्रुक, रढावण, नंदगाव, मठगव्हाण, गोवर्धन या ग्रामपंचायतीत ३० नोव्हेंबर ला तर दोधवद, अमळगाव, ढेकू सिम, मंगरूळ, भरवस, लोंढवे, मुडी प्र. डांगरी या गावांना १ डिसेंबर रोजी उपसरपंच निवड होणार आहे.