
सरचिटणीसांचे निवडीचे पत्र, मात्र नियुक्त्या स्थगित झाल्याची जिल्हाध्यक्षांची माहिती…
अमळनेर:- काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच झालेल्या तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्या नियुक्त्यांना निरीक्षकांचा अहवाल सादर होईपर्यंत तूर्त स्थगित झाल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वीच प्रदेश काँग्रेसचे संघटन व प्रशासन सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नावाने पत्र पाठवून अमळनेर तालुकाध्यक्षपदी धनगर पाटील व तालुका कार्याध्यक्षपदी भागवत केशव सूर्यवंशी (पूर्व विभाग), ॲड गिरीश प्रकाश पाटील (पश्चिम विभाग) तर शहराध्यक्षपदी मेहराजुद्दीन शेख अल्लाउद्दीन यांची व शहर कार्याध्यक्षपदी समाधान कंखरे (पूर्व विभाग), प्रवीण गंगाराम पाटील (मुख्य शहर भाग) यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने करण्यात आल्याचेही पत्रात म्हटले होते. नियुक्तीचे पत्र व्हायरल होताच काहींनी प्रदेश काँग्रेसकडे तक्रारी केल्या. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या मान्यतेने अमळनेर शहर व तालुका पदाधिकारींची नियुक्तीबाबत निरीक्षक नेमण्यात आले आहेत. निरीक्षक आल्यानंतर सर्वांचे म्हणणे ऐकून घेतील त्यांनतर ते प्रदेश पातळीवर अहवाल पाठवतील. प्रदेश पातळीवरून जिल्हाध्यक्षांना कळवण्यात येईल आणि त्यानंतर जिल्हाध्यक्ष नियुक्ती करतील तोपर्यंत या नियुक्त्याना तात्पुरती स्थगिती असेल अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली. तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांची नियुक्ती जिल्हाध्यक्षांनी पत्राद्वारे करावी, अशी काँग्रेसची पद्धत आहे. व नुकतेच प्राप्त झालेले पत्र हे जिल्हाध्यक्षांच्या नावे होते. त्यावर जिल्हाध्यक्षांनी अंमलबजावणी करायची होती परंतु तत्पूर्वी हे पत्र व्हायरल करून नियुक्तीच्या बातम्या व्हायरल झाल्याने गोपनियतेचा भंग झाला, अशी पद्धत चुकीची असल्याने व नियुक्त्या योग्य नसल्याने तक्रारी गेल्या होत्या, असेही प्रदीप पवार यांनी सांगितले.
नियुक्तीवरून रंगला काँग्रेसच्या नेत्यात रंगला कलगीतुरा…
नेते पक्षांची सेवा करतात मात्र काँग्रेस पक्षाचा वापर करून अनेकांनी आपली घरे भरली, संस्था काढल्या, पुढच्या पिढीची सोय करून ठेवली मात्र उतरती कळा लागल्यावर हेच नेते दुसऱ्या पक्षाच्या आश्रयाला गेले. अनेकांनी पक्षाच्या जीवावर टोलेजंग बंगले बांधले मात्र तालुक्यात पक्षाला साधे कार्यालय नाही.शहरात काँग्रेस पक्षाच्या मालकीची मोठी जागा आहे. मात्र एका नेत्याच्या अंगणात जावून पदाधिकाऱ्यांना जयंती – पुण्यतिथी साजरी करावी लागते. तालुका काँग्रेसपेक्षा किसान काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी तालुक्यातील जास्त सक्रिय आहेत. मात्र इतर काँग्रेस नेते दुसऱ्या पक्षाच्या स्टेजवर जाण्यावरच धन्यता मानतात. काही नेते प्रत्येक विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराच्या मागे पळतात. आता काही पदाधिकारी स्वतःच्या वार्डात निवडून येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. मात्र ते ही पद सोडायला तयार नाही आणि पक्षवाढीसाठी काम ही शून्य असल्याने पक्ष संपल्यात जमा झाल्याचे काही प्रामाणिक कार्यकर्ते खाजगीत सांगतात.

