मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांतून ७० कोटी निधीस मंजुरी…
अमळनेर:- शहरातील मुख्य बाजारपेठेसह इतर महत्वपूर्ण रस्ते नुतनीकरणाची भेट मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल पाटील दिवाळीत अमळनेरवासीयांना दिली असताना आता पुन्हा नव्या रस्त्यांची अनमोल भेट मंत्री नामदार पाटील यांनी दिली असून या भेटीच्या माध्यमातून रस्ते विकास प्रकल्पांतर्गत शहरात 70 कोटी निधीतून चार (डीपी रोड) शॉर्टकट् मार्ग साकारणार आहेत.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत या नवीन रस्त्यांना मंजुरी मिळाली असून यासंदर्भात महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाचा शासन निर्णय दि ४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाला आहे. यात प्रामुख्याने धुळे रोड व गलवाडे रोड या दोन प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या डीपी रोडचा समावेश असल्याने खऱ्या अर्थाने शहराच्या दळणवळणास गती देणारा हा शासन निर्णय असून या रस्त्यांच्या परिसरातील शेकडो कुटुंबियांनाही मोठा लाभ होणार आहे.
या डीपी रस्त्यांना मिळाली प्रशासकीय मान्यता…
गलवाडे रोड ते धुळे रोड रक्कम रुपये २३८८१४०१५/-, पिंपळे रोड ते तुळजाई हॉस्पीटल धुळे रोड रक्कम रुपये २५७८२१२४/-, धुळे रोड ते ओमशांती नगर रक्कम १९४०९४८४२/- ईदगाह मैदान ते विप्रो कंपनी रक्कम रक्कम ११५१२६१४७ असे ऐकून एकूण ७०.८८ कोटी निधीतून हे रस्ते मंजुर झाले आहेत.
यात गलवाडे रोड ते धुळे रोड या दोन मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या नवीन डीपी रोडचा समावेश असल्याने नागरिक तथा वाहनधारकांना एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर जाणे सहज व सोपे होणार आहे. प्रामुख्याने कॉलनी भागातील नागरीकांसाठी हा मार्ग वरदान ठरणार आहे. पिंपळे रोड ते तुळजाई हॉस्पिटलपर्यंतच्या नवीन रस्त्यामुळे ढेकू रोड व पिंपळे रस्त्यावरील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.धुळे रोड ते ओमशांती नगर पर्यतचा नवीन रस्ताही नवीन कॉलनी भागातील लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. आणि इदगाह मैदान ते विप्रो कंपनी पर्यतच्या नवीन रस्त्यामुळे तांबेपुरा,सानेनगर व बोरी काठच्या गावांना नवीन पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून विशेष करून विप्रोसाठी देखील हा मार्ग लाभदायी ठरणार आहे.
एकंदरीत मंत्री अनिल पाटील यांनी “न भूतो न भविष्यती” अशी अनमोल भेट अमळनेरवासीयांना दिली असून ही भेट भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सदर मंजुरीबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना अजित पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत. तर नागरिकांनी देखील या विकासात्मक मंजुरी बद्दल मंत्री अनिल पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.
Related Stories
December 22, 2024