११ रोजी नागपूर विधानभवनावर आक्रोश मोर्चात होणार रूपांतर…
अमळनेर:- शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी सरसकट दुष्काळ जाहीर करण्यासाठी आणि पीक विम्याची रक्कम मिळावी म्हणून काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या शेतकरी संवाद यात्रेचे अमळनेरात जोरदार स्वागत करण्यात आले. या संवाद यात्रेचे पुढे ११ डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर आक्रोश मोर्चात रूपांतर होणार आहे.
नंदुरबार येथील हुतात्मा चौकातून ४ डिसेंम्बर रोजी संवाद यात्रेला प्रारंभ झाला. ५ रोजी रात्री १० वाजता धुळे जिल्ह्यातून यात्रेच्या अमळनेर हद्दीत प्रवेश केला. यावेळी चोपडाई आणि कोंढावळचे सरपंच डॉ भूषण पाटील, सरपंच भाऊलाल नाईक यांनी शेतकऱ्यासंमवेत स्वागत केले. या संवाद यात्रेत किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पास्ते,, उपाध्यक्ष प्रा विश्वंभर बाबर (सातारा), राम कुऱ्हाडे, समन्वयक किशोर वानखेडे, सहदेव हिंदोळे पाटील (बीड), देवाजी चौधरी (नंदुरबार),कपिल जाधव (साक्री),धुळे जिल्हाध्यक्ष श्याम भामरे, जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष प्रा सुभाष पाटील,अमळनेर तालुकाध्यक्ष दिनेश पवार, के डी पाटील, डॉ अनिल शिंदे हजर होते. पुढे संवाद यात्रा डांगर, जानवे मार्गे अमळनेर येथे आली. अमळनेरला मुक्काम केल्यावर ६ रोजी सकाळी ८ वाजता बळीराजा स्मारकाला अभिवादन करून संवाद यात्रेला सुरुवात झाली. वाजत गाजत छत्रपती शिवाजी स्मारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सानेगुरुजी पुतळा, सुभाषचंद्र बोस पुतळा, पैलाड क्रांती स्मारक यांना अभिवादन केले. पैलाडला शेतकऱ्यांनी स्वागत केले. नंतर पुढे हेडावे येथे शेतकऱ्यांनी स्वागत केले. त्यानंतर सारबेटे येथे सभा झाली. शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पुढे ढेकू येथे पदयात्रा, राजवड येथे सभा झाली. त्यांनतर संवाद यात्रा धरणगाव कडे निघाली. धरणगाव येथे स्वागत होऊन थोर पुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून चिंचपूरा येथे स्वागत झाले आणि संवाद यात्रा जळगाव कडे रवाना झाली.
११ डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर संवाद यात्रा पोहचताच त्याचे आक्रोश मोर्चात रूपांतर होईल. यात अनेक शेतकरी व काँग्रेस नेते सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोग लागू करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रुपये बोनस देण्यात यावा, महात्मा फुले प्रोत्साहन योजनेत नियमित शेतकरी पात्र ठरवून ५० हजार रुपये अनुदान मिळावे, यासह अनेक मागण्या शासनाकडे करण्यात येणार आहे.
Related Stories
December 22, 2024