महसूलच्या दंडासह अमळनेर पोलीसात चोरीचा गुन्हाही होणार दाखल…
अमळनेर:- अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना आता यापुढे पोलीस आणि महसूल या दोन्ही कारवायांना सामोरे जावे लागणार आहे. महसूलच्या दंडासह चोरीचा गुन्हाही दाखल केल्याशिवाय वाळू वाहतुकीची वाहने पोलीस स्टेशनच्या आवारात जमा करणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे.
दोन तीन दिवसांपूर्वी महसूलच्या तलाठी पथकाने अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर पोलीस स्टेशनच्या आवारात आणले. मात्र तलाठी वाळू चोरीची फिर्याद द्यायला नकार देत होते. म्हणून पोलिसांनी आमच्याकडे गुन्हा नाही तर ट्रॅक्टर आम्ही जमा करणार नाही अशी भूमिका घेतली होती. अनेकदा महसूल विभागाकडून अवैध वाळू वाहतुकीची वाहने पकडली जातात. पोलीस स्टेशनला जमा केली जायची. नंतर हे वाळू वाहतूकदार दंड भरून आपली वाहने सोडवून घ्यायची किंवा पोलीस स्टेशनच्या आवारातून वाहने पळवून नेण्याची शक्यता होती. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल नसताना पोलिसांना त्याकडे लक्ष देऊन जबाबदारी स्वीकारावी लागत होती. परिणामी वाळू वाहतूकदार मुजोर झाले. किंवा फक्त पोलीस कारवाई झाल्यास महसूलचा दंड आणि बॉण्ड भरला जात नव्हता. अवैध वाळू उत्खनन थांबवण्यासाठी आणि वाळू चोरांची दादागिरी संपुष्टात आणण्यासाठी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी कठोर भूमिका घेत वाळू चोरीची फिर्याद घेतल्याशिवाय वाहन जमा करू नये अशी भूमिका घेतली. त्यामुळे वाळू चोरांची चांगलीच पंचाईत होणार आहे. महसूलचा दंड, आणि कोर्टाच्या चकरा चांगल्याच महागात पडणार आहेत. तसेच अनेक गुन्हे दाखल झाल्यास एमपीडीएसारख्या कारवाईला देखील सामोरे जावे लागणार आहे.