सिंधी कॉलनीत रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन, मंत्री पाटील यांचे झाले जंगी स्वागत…
अमळनेर:- जसेच्या तसे अमळनेर आपण पुढच्या पिढीला दिले तर पुढची पिढी आपल्याला मुळीच माफ करणार नाही यासाठीच अमळनेरात भरघोस विकासकामे आणून विकासाची वाटचाल आपण करीत असून उद्याचे अमळनेर कसे असेल याची ब्ल्यू प्रिंट आपल्याकडे तयार असल्याचे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांनी केले.
सिंधी कॉलनीत 59 लक्ष निधीतून ट्रीमिक्स रस्ता काँक्रीटीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अर्बन बँकेचे संचालक भरतकुमार सुरेश ललवाणी यांनी हा सोहळा आयोजित केला होता,मंत्री अनिल पाटील यांचे आगमन होताच त्यांचेसह माजी जि प सदस्या सौ जयश्री पाटील यांच्यावर फुलांचा वर्षाव करून जोरदार स्वागत करीत कृष्ण पेट्रोलियम पासून ओपन जिप्सी मधून त्यांची वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत भूमीपूजन पार पडले.यानंतर आयोजित सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उद्योजक सरजू गोकलानी तर मंचावर पु सिंधी जनरल पंचायतीचे अध्यक्ष प्रकाशलाल जग्यानी,उपाध्यक्ष संजयकुमार बितराई,अमळनेर शहर सिंधी जनरल पंचायतीचे अध्यक्ष चेलाराम सैनानी,उपाध्यक्ष लालचंद सैनानी,माजी अध्यक्ष हिरानंद पंजाबी,राम मलकानी, दिलीप जगमलानी,समाजसेवक दिलीप ललवाणी,मार्केटचे माजी संचालक शंकरलाल बितराई, परिवहन अधिकारी नीलम किशोर सैनानी व मान्यवर उपस्थित होते.यावेळी मंत्री अनिल पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला.सुरवातीला प्रास्तविक भरतकुमार ललवाणी यांनी केले.याशिवाय उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना मंत्री अनिल पाटील पुढे म्हणाले की, यापूर्वी अनेकदा सिंधी कॉलनीत आलो पण आज जे अभूतपूर्व स्वागत झाले ते माझ्यासाठी अनमोल आहे,माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेशशेठ ललवाणी यांनीच मला पहिले काम दिल्याने मला दिशा मिळाली,त्यांच्या रूपाने वाघ माणूस गेला मात्र त्यांची आठवण आजही कायम असून त्यांचे कार्य कुणीही विसरू शकणार नाही,आज सिंधी कॉलनीततील नागरिकांनी विकास कामाची मागणी केली आणि यादीत पहिलं नाव सिंधी कॉलनीचे घेतले,येणाऱ्या काळात येथील लोकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील हा माझा शब्द असून येथील नकाशा नक्की बदलणार ही ग्वाही आहे.या कार्यक्रमात संपूर्ण सिंधी समाज एकजूट झालेला दिसतोय हे चांगले संकेत असून आज सिंधी समाज शहराच्या मुख्य बाजारपेठेत जेथे व्यवसाय करतोय तेथे सर्व रस्त्यांची होत असलेली कामे आपण पाहत आहेत,नागरिकांची सोय व व्यापारी बांधवांचा व्यापार समृद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. 75 वर्षात प्रथमच अमळनेर ला मंत्री म्हणून संधी मिळाली त्याचे सोने करण्याचा प्रयत्न असून तब्बल 5 हजार कोटींची पाडळसरे धरणाची सुप्रमा मिळवली हा त्याचाच एक भाग आहे, असेही ते म्हणाले.तसेच गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आपल्या मतदारसंघाला विकाऊ म्हणून लागलेला डाग पुसला गेल्याने आज प्रतिमा बदलली असून, रस्त्यावर केक कटिंग करणे,दादागिरी,गुंडगिरी, रस्त्यावरील टपोरीगिरी थांबली. यामुळे समस्त व्यापारी बांधव, विद्यार्थिनी व महिला आज सुरक्षित झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री सोनवणे तर आभार प्रकाश जग्यानी यांनी मानले.