३१ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजन…
अमळनेर:- सावित्रीबाई महिला महोत्सव म्हणजे महिलांच्या लुप्त होत चाललेल्या खेळाचे प्रकार आणि कौशल्यांवर प्रकाश टाकून महिलांना व्यक्त होण्याचे उत्तम व्यासपीठ आहे. महिला महोत्सवाच्या स्पर्धांमधून त्यांच्यात धाडस निर्माण होऊन समाजात त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकतील, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले. नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण विभाग व अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावित्रीबाई महिला महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
३१ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात महिला महोत्सव होत आहे. मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते महिलांच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. ते पुढे म्हणाले की आगामी काळात महाराष्ट्र शासन महिलांना सक्षम करण्यासाठी ,महिलांना सर्व क्षेत्रात सहभागी होता येईल, त्या स्वावलंबी कशा होतील, त्यांना आर्थिक पाठबळ देता येईल याबाबत धोरण अमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहे अशीही माहिती दिली. यावेळी प्रास्ताविक करताना प्रशांत सरोदे म्हणाले की महिला बाल कल्याण विभागाच्या ५ टक्के निधीतून महिला सक्षमीकरण करण्यासाठी, बालकांच्या विकासासाठी हे कार्यक्रम आयोजित केले जातात. पालिकेने महिला जिम,अभ्यासिका सुरू केल्या आहेत. माजी आमदार स्मिता वाघ, डॉ अनिल शिंदे, जयश्री पाटील, डॉ अपर्णा मुठे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी मंत्री अनिल पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉ अनिल शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, सभापती अशोक पाटील, महिला मंचच्या अध्यक्षा डॉ अपर्णा मुठे, कांचन शहा,सरोज भांडारकर, प्रशासन अधिकारी संजय चौधरी हजर होते. सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले.
विद्या हजारे, माधुरी पाटील, भारती पाटील, प्रा शिला पाटील, भारती गाला, विमल देसरडा, करुणा सोनार, प्रियंका पाटील, रंजना देशमुख यांनी महोत्सव आयोजनासाठी सहकार्य केले. कार्यक्रमास सुलोचना वाघ, लीना पाटील, डॉ भाग्यश्री वानखेडे, रामलाल पाटील, विजय पाटील, आशा चावरीया हजर होते.
महिला महोत्सवात वारली पेंटींग ,सायकल स्पर्धा ,नृत्य स्पर्धा , नाट्य स्पर्धा , भजन स्पर्धा , महिला ऑर्केस्ट्रा , लावण्यवती लावणी स्पर्धा , आनंद मेळावा ,गेम स्टॉल्स आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाला श्वेता इनामदार , डॉ आशाताई मिरगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.