महाराष्ट्रातून एकमेव निवड, पिळोदा येथील सुपुत्रावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव…
अमळनेर:- इंडियन नॅशनल यंग अकादमी ऑफ सायन्सेस (INYAS) च्या समितीत भारतातील ३० कुशल तरुण शास्त्रज्ञांचा समावेश करण्यात आला असून महाराष्ट्रातील एकमेव अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथील डॉ हितेश पवार यांची निवड करण्यात आली आहे.
प्रतिष्ठित गटांमध्ये मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) चे प्राध्यापक डॉ हितेश पवार यांचा समावेश आहे. इंडियन नॅशनल यंग अकादमी ऑफ सायन्स हे एक व्यासपीठ आहे जे भारतातील वैज्ञानिक संशोधन आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन देण्यासाठी तरुण शास्त्रज्ञ, विद्वान आणि शिक्षणतज्ज्ञांना एकत्र आणते. (INYAS )चे उद्दिष्ट तरुण शास्त्रज्ञांना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, संशोधन प्रकल्पांमध्ये सहयोग करण्यासाठी आणि वैज्ञानिक समुदायात योगदान देण्यासाठी एक मंच प्रदान करण्याचा आहे.
डॉ. पवार यांचा( INYAS) मधील समावेश हे त्यांचे विज्ञान आणि शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय योगदान आहे. आय सी टी मध्ये प्राध्यापक म्हणून, त्यांनी संशोधनाला पुढे नेण्यासाठी आणि वैज्ञानिक नवकल्पना वाढवण्याची वचनबद्धता दाखवली आहे. नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे ५० हून अधिक संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या नावावर अनेक पेटंट देखील मंजूर आहेत. त्यांना संशोधन कार्यामध्ये संस्थेचे कुलगुरू प्रा. डॉ. अनिरुद्ध पंडित यांचे मार्गदर्शन लाभले. नवनिर्वाचित सदस्यांचा औपचारिक समावेश सोहळा फेब्रुवारीमध्ये आगामी वार्षिक सर्वसाधारण सभा (जी बी एम ) दरम्यान नवी दिल्ली येथील इंडियन नॅशनल सायन्स अकादमी (INSA) मुख्यालयात होणार आहे.