चौघांनी तिघांच्या डोक्यात रॉड व स्टंपने मारून केले रक्तबंबाळ…
अमळनेर:- क्रिकेट मॅच अर्ध्यावर का सोडली ? या कारणावरून यात्रेत आलेल्या दुकानदारांच्या दोन गटात हाणामारी होऊन चौघांनी तिघांना जखमी केल्याची घटना बोरी नदीच्या पात्रात २ रोजी सायंकाळी घडली.
पंकजकुमार मन्ना (रा ओमपुरी ता जिल्हा हरदोई उत्तरप्रदेश) याने फिर्याद दिली की, २ रोजी सायंकाळी बोरी नदी पात्रात कसाली भागाकडे पुलाजवळ तो स्वतः व लहान भाऊ संजीव , पंकज व मामा राजीवकुमार ओमप्रकाश , सुरेंद्रकुमार अरुणकुमार राकेश, अंकीतकुमार गुड्डा, छोटुकुमार नरेश, रोहितकुमार रामकुमार यांना घेऊन यात्रेत बॅट विक्रीसाठी आलेले अरविंद दर्यासिंग मोरे, निलेश रमेश ठाकरे, रवींद्र किसन काठोडी, आकाश काठोडी यांच्याशी पाच पाच ओव्हरची मॅच खेळत होते. मॅच जिंकण्याचा राग आल्याने चौघांनी शिवीगाळ सुरू केल्याने मॅच खेळणे थांबवून घेतले. तेव्हा अरविंद,निलेश रवींद्र व आकाश यांनी मॅच का थांबवली म्हणून पुन्हा चापट बुक्क्यांनी मारहाण सुरू केली आणि रवींद्र काठोडी याने पंकजच्या डोक्यात रॉड मारल्याने रक्तबंबाळ होऊन रक्त वाहू लागले. तेव्हढ्यात राजीव यांच्याही कानावर स्टंप मारल्याने त्याच्याही कानातून रक्त वाहू लागले. लगेच सुरेंद्र कुमार याच्या डोक्यात एकाने स्टंप मारल्याने त्याच्याही डोक्यातून रक्त वाहू लागले. आजूबाजूच्या लोकांनी येऊन भांडण सोडवले व पोलिसांनी दिलेल्या मेमोनुसार ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले. उपचार घेतल्यानंतर बरे वाटल्यावर अमळनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून चौघांविरुद्ध भादवि कलम ३२४, ३२३, ५०४ ,५०६,३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.