दुचाकीस्वार शिक्षक गंभीर जखमी, पोलीसात गुन्हा दाखल…
अमळनेर:- अमळनेर ते बेटावद रस्त्यावरील भरवस गावाजवळील रेल्वे बोगद्याजवळ भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार शिक्षक जखमी झाल्याची घटना १ रोजी घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीसात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील संताजी नगर भागातील रहिवासी किशोर रामचंद्र भोई (वय ३७) हे शिंदखेडा तालुक्यातील अजंदे बु. येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असून दररोज दुचाकीने शिक्षकांच्या सोबतीने अपडाऊन करत असतात. दिनांक १ रोजी नेहमीप्रमाणे होंडा शाईन दुचाकीने शाळेवर जात असताना सकाळी १०:३० वाजता बेटावद रस्त्यावर भरवस गावाजवळ असलेल्या रेल्वे बोगद्याच्या वळणावर समोरून येणाऱ्या मारुती एस प्रेसो (गाडी क्रमांक एम्एच १८ बीआर ८२२७) या चारचाकी चालकाने राँग साईडने गाडी चालवत भोई यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. त्यामुळे भोई हे दुचाकीसह फेकले जावून रस्त्यावर पडल्याने गंभीर दुखापती झाल्या. त्यांच्या सोबत असलेल्या शिक्षक पराग सोमवंशी व नितीन पाटील यांनी त्यांना बेटावद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून धुळे येथे नेण्याचा सल्ला दिल्याने त्यांना धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते फिर्याद देण्याच्या परिस्थितीत नसल्याने पराग सोमवंशी यांच्या फिर्यादीवरून चारचाकी चालकाविरुद्ध मारवड पोलीसात फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ किशोर पाटील करीत आहेत.