4 कोटी निधीतून उभारले उपकेंद्र,अनेक गावांचा विजेचा प्रश्न सुटला,शेती उद्योगालाही मिळणार बळकटी
अमळनेर -विधानसभा मतदारसंघातील सारबेटा येथे 4 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या 33/11 के.व्ही. उपकेंद्राचे लोकार्पण माजी मंत्री तथा आ.अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे हेडावे, सुंदरपट्टी, रढावण, राजोरे, एकरुखी, सारबेटा बु., सारबेटा खु., ढेकु बु., ढेकु खु., जुनोने, खेडी, रामेश्वर, पळासदळे अशा अनेक गावांना वीजपुरवठ्याची समस्या दूर झाली असून त्यांच्या विकासाला नवी चालना मिळणार आहे.या परिसरात सतत अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी, छोटे उद्योजक आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता.यासाठी आमदार पाटील यांनी प्राधान्याने 4 कोटी निधीतून हा प्रकल्प मंजूर केला होता.याचे काम पूर्णत्वास आल्याने याचे लोकार्पण आमदारांच्या हस्ते करण्यात आले.यामुळे परिसरात विजेच्या सर्व अडचणी दूर करून, विकासाच्या मूलभूत सुविधांचा लाभ देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरला आहे. कृषी उत्पादनासाठी वीज ही अत्यावश्यक आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनक्षमता वाढणार असून ग्रामस्थांच्या जीवनशैलीत सुधारणा होण्यासह उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे.
या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, प्रा. सुरेश पाटील, भोजमल पाटील, समाधान धनगर, महारू आण्णा ढेकु, रढावण सरपंच भैय्यासाहेब पाटील, सारबेटा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदारांच्या दूरदृष्टीने मतदारसंघात चार ठिकाणी होणार उपकेंद्र
माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी मतदारसंघात दूरदृष्टी ठेऊन केवळ सारबेटाच नव्हे तर फाफोरे,मारवड व पारोळा तालुक्यातील शेळावे येथेही 33/11 के व्ही उपकेंद्र मंजूर केले आहे.यामुळे या उप केंद्रांच्या परिसरातील गावांचा विजेचा प्रश्न तर सुटणार आहेच परंतु प्रकल्प मंजुर करण्याचे मुख्य कारण म्हणजे आमदार पाटील यांनी पाडलसरे धरणावरून शेतकऱ्यांना थेट शेतात पाईपलाईन द्वारे पाणी पोहोचविण्यासाठी 1 हजार कोटींची जी वॉटर लिफ्टिंग योजना मंजुर केली आहे,त्याचे भूमिपूजन लवकरच होऊन काही दिवसातच काम पूर्णत्वास येणार आहेत. सदर काम झाल्यावर शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करताना त्यावेळी विजेची अडचण निर्माण होऊ नये म्हणून कॅपिसीटी वाढविण्यासाठी हे चार प्रकल्प दूरदृष्टी ठेऊन आमदार अनिल पाटील यांनी मंजूर केले असुन त्यांच्या दूरदृष्टीचे कौतुक होत आहे.