अमळनेर:- राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अमळनेरचे असून आम्हाला मदतीसाठी दोन अडीच वर्षे वाट पहावी लागते, याचा अर्थ शासन शेतकऱ्यांबद्दल उदासीन आहे, असा आरोप करत २०२१ मधील अवकाळी अतिवृष्टीची नुकसान भरपाई न मिळाल्यास १८ जानेवारीपासून साखळी उपोषणास बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
२०२१ मध्ये खरीप हंगामात अवकाळी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झाले होते. २६ ते २७ महिने उलटूनही आम्हाला आजपर्यंत मदत मिळालेली नाही. यापूर्वी अनेकदा निवेदने देऊनही दखल घेतली जात नाही. म्हणून १६ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा न झाल्यास १८ जानेवारीपासून शेतकरी साखळी उपोषणास बसतील. व होणाऱ्या नुकसानीस व शेतकऱ्यांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास शासन जबाबदार राहील असा इशारा प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर दहिवद, मारवड, तांदळी, धानोरा, सबगव्हान, लोण, भोरटेक, जवखेडा, सडावण, पिंपळे, मुडी, गोवर्धन येथील शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.