अमळनेर:- एस टी महामंडळातर्फे १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान इंधन बचत मासिक कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या फलकाचे अनावरण सानेगुरुजी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांच्या हस्ते तर शुभारंभ जेष्ठ चालक दीपक पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
एस टी महामंडळाच्या एकूण खर्चाच्या ४० टक्के खर्च इंधनावर होतो. त्यामुळे इंधनाची बचत करणे गरजेचे आहे. म्हणून हा मासिक कार्यक्रम सर्वत्र आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक इम्रान खान पठाण होते. मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी चालक, वाहक, यांत्रिकी यांना मार्गदर्शन करताना सांगितले की बऱ्याचदा जादा प्रवासी बसमध्ये बसतात परंतु त्यावेळी बस बंद करा, यांत्रिकी काम करतात तेव्हा बस सुरू करून पाहतात त्यांनतर पुन्हा दुसऱ्या कामाला वेळ लागतो परंतु आपल्याला कंटाळा येतो म्हणून बस सुरूच ठेवतो मात्र दरम्यानच्या काळातील इंधनाची आपल्याला बचत करता येते. वाहतुकीची खूप कोंडी झाली असेल तेव्हा देखील अनेकदा आपण बस सुरू ठेवतो अशा अनेक दैनंदिन प्रसंगातून आपल्याला इंधन बचत करता येते. या उपक्रमात चांगल्या केपीटीएल देणाऱ्या चालकांची नावे दररोज प्रकाशित करण्यात येणार आहेत. तर कमी केपीटीएल देणाऱ्या वाहनाची आवश्यक ती कामे करण्यात येणार आहेत. कार्यक्रमास स्थानक प्रमुख चौधरी, कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बाविस्कर, वाहतूक निरीक्षक न्ह्याळदे, लिपिक सोनाली धनगर, भारती धनगर तसेच वाहक चालक हजर होते.