शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पालिकेकडून जोरदार तयारी…
अमळनेर:- शहरात तीन अखिल भारतीय साहित्य संमेलन होत असल्याने अमळनेर नगरी नटू लागली आहे. पालिकेने शहर स्वच्छ व सुंदर करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.
९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ ते ४ फेब्रुवारी, १८ वे विद्रोही साहित्य संमेलन ३ व ४ फेब्रुवारी रोजी तर २७ व २८ जानेवारी रोजी पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन होत आहे. यानिमित्त शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नामवंत व्यक्ती, साहित्यिक येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अमळनेर नगरी सज्ज होत आहे.
मुख्य धुळे चोपडा रस्त्यावरील दुभाजकाना रंग रंगोटी करण्यात येत आहे. जुने पथदिवे बदलवून रेट्रो फिटिंगचे दिवे लावले जातात आहेत. शहरातील इतर मुख्य रस्त्यांच्या दुभाजकाना देखील रंग देऊन त्यात फुलझाडे व शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. विविध शासकीय भिंती तसेच मुख्य रस्त्यांवरील भिंतींवर आकर्षक चित्रे ,स्वच्छ भारत अभियान , विविध साहित्यिकांची चित्रे रेखाटण्यात येणार आहेत. ग्रंथ दिंडी मार्ग सुशोभित करण्यात येणार आहे. रात्री विविध रंगांची लायटिंग लावण्यात येणार आहे.
प्रतिक्रिया…
धुळे रस्त्यावरील काढलेले पथदिवे शहरातील ज्या भागात पथदिवे नाहीत त्याठिकाणी लावण्यात येतील. बाहेरून आलेल्या साहित्यिक आणि रसिकांसाठी शहर सज्ज आहे.
:- प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी, नगरपरिषद अमळनेर