डॉ.निखिल बहुगुणे, निरंजन पेंढारे, दिपाली भोईटे यांचा शुक्रवारी होणार गौरव..
अमळनेर:- येथील श्रीमंत प्रतापशेठ चॅरिटेबल फाउंडेशन व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल यांच्यातर्फे तीन जणांना “स्वामी विवेकानंद विशिष्ट सेवा पुरस्कार” जाहीर करण्यात आला. यात हृदयरोग तज्ञ डॉ निखिल बहुगुणे, वावडे येथील श्री बी बी ठाकरे माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक निरंजन पेंढारे, महिला हाऊसिंग ट्रस्टच्या समन्वयिका दिपाली भोईटे याचा समावेश आहे. या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी (ता.१९) दुपारी पाचला येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये होणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हे अध्यक्षस्थानी राहणार असून परिवर्तन सांस्कृतिक संस्थेचे शंभू पाटील व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे सातवे “समर्पण” वार्षिक कार्यक्रमही होणार आहे. दरम्यान दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. यात वैद्यकीय क्षेत्रात विशेष कामगिरी करणारे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. निखिल बहुगुणे यांना, शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवणारे निरंजन पेंढारे यांना, तर अमळनेर महिला हाऊसिंग ट्रस्टच्या समन्वयिका दिपाली भोईटे या संस्थागत पुरस्कार जाहीर करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन बजरंग अग्रवाल, प्रा डी डी पाटील, सीए निरज अग्रवाल, प्राचार्य विनोद अमृतकर यांनी केले आहे.