फुले व रोषणाईने सजले मंदिर, दर्शनासाठी उसळणार मोठी गर्दी…
अमळनेर:- अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयासमोरील पुरातन भव्य श्रीराम मंदिर देखील फुले व रोषणाईने सजविण्यात आले असून आज दिवसभरात श्रीमंत प्रतापशेठजी यांच्या परिवाराकडून अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
मंदीरात दर्शनासाठी मोठी गर्दी उसळणार असल्याने मंदिर व्यवस्थापनाने उत्कृष्ठ नियोजन केले आहे. श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या परिवारातील सदस्या संगीता एम अग्रवाल आणि मिलिंद एम अग्रवाल यांच्यासह रामभक्त सेवेकरी मंडळी यासाठी परिश्रम घेत आहेत.सुंदर रोषणाईने सजविलेल्या मंदिराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने संपुर्ण जिल्ह्याचे या मंदिराकडे लक्ष वेधले गेले आहे.
1942 साली श्रीमंत प्रताप शेठजींनी केली निर्मिती…
अमळनेर नगरीत खऱ्या अर्थाने औद्योगिक आणि शैक्षणिक वैभव निर्माण करणाऱ्या श्रीमंत प्रताप शेठजी यांनी १९४२ साली या भव्य राम मंदिराची निर्मिती केली होती. ८० वर्ष पुरातन असलेले हे भव्य मंदिर अतिशय मोठ्या जागेत उभारण्यात आले असून मंदिराचे बांधकाम अतिशय सुंदर व नक्षीदार आहे.मंदिर परिसरात वृक्षांचे नंदनवन असल्याने दिवसभर या परिसरात गारवा राहत असतो. शेठजी यांच्या नंतर त्यांच्या परिवाराने मंदिराची देखभाल केली असून दररोज नित्यपूजा, आरती याशिवाय वर्षभर धार्मिक कार्यक्रम होत असतात तर श्री राम नवमीला जन्मोत्सवाचा मोठा उत्सव पार पडुन दर्शनासाठी मोठी गर्दी येथे होत असते, सद्यस्थितीत या मंदिराची देखभाल प्रताप शेठजी यांच्या परिवारातील संगीता अग्रवाल व मिलिंद अग्रवाल हे करीत आहेत.
आज दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल…
सदर मंदिरात आज दिवसभर श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या परिवाराकडून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत,सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान पवन शर्मा धुळेकर यांचे सुंदरकांड होणार असून दुपारी १२.१५ वाजता आगमन आरती त्यानंतर रामधून गीत व फुलांची होळी होणार आहे.तर सायंकाळी पाचनंतर अमळनेरकर यांच्याकडून रामधून व भजन आदी कार्यक्रम होणार आहेत.
सायंकाळी गीत रामायण…
आज सायंकाळी ७.१५ वाजता श्रीराम भक्त मंडळ व स्वरसुमन फाऊंडेशन अमळनेर प्रस्तुत महाकवी ग दि माडगूळकर व महान गायक सुधीर फडके यांच्या प्रतिभेचा अनोखा आविष्कार गीत रामायण सादर होणार आहे.यात गायक म्हणून अमळनेर येथील नेत्ररोगतज्ञ व शास्त्रीय
गायक डॉ अमोघ जोशी तर सहकलाकार म्हणून तबला योगेश संदानशिव, श्रीपाद शिरवाडकर, संवादिनी जितेश मराठे, व्हायोलिन प्रबोध जोशी,तालवाद्य प्रथमेश शिरवळकर तर निवेदन गिरीश चौक करणार आहेत.या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रत्येकाने जरूर दर्शन घ्या…
अयोध्या येथे तब्बल ५०० वर्षांनंतर श्री रामलल्ला मंदिरात विराजमान होत असल्याने संपूर्ण भारतभरात प्रचंड मोठा धार्मिक जल्लोष होत आहे,यानिमित्ताने देश भरातील साधू संत अयोध्येत पोहोचले आहेत,तो सोहळ्यासाठी आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नसलो तरी सुदैवाने अमळनेरात श्रीमंत प्रताप शेठजी यांनी निर्माण केलेले भव्य श्रीराममंदिर असल्याने आपण येथेच श्रीरामाचे दर्शन घेऊन तेथील अनुभूती घेऊ शकतो त्यासाठी अमळनेर तालुका व परिसरातील प्रत्येक भाविकाने दर्शनासाठी अवश्य यावे असे आवाहन तमाम श्रीराम भक्त आणि केशवनगर,अयोध्या नगर, रामवाडी, बंगाली फाईल येथील मित्र मंडळांनी केले आहे.