शेड नेट घोटाळ्याप्रकरणी दोन आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन…
अमळनेर:- वारंवार निवेदन देऊनही शेड नेट घोटाळ्याची चौकशी होत नसल्याने चौघांनी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयाबाहेर स्वतःला गाडून घेत अनोखे आंदोलन केले. दोन आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व तालुका कृषी अधिकारी सी जे ठाकरे यांनी दिल्याने तीन तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अमळनेर व पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांची सरकारच्या अनुदानित शेडनेट तसेच पॉलिहाऊस मध्ये घोटाळा झाला असून दलालांनी साहित्य शेतकऱ्यांपर्यंत न पोहचविता परस्पर रक्कम हडप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पाटील, शिवसेनेचे अनंत निकम, कैलास पाटील,नारायण पाटील, ईश्वर पाटील,दिनेश पाटील, राजेश पाटील,ज्ञानेश्वर पाटील, सुरेश पाटील, अरुण भागवत, दीपक पाटील, कन्हैय्यालाल पाटील, बाळू पाटील, विक्रम पाटील या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारीकडे करून चौकशी करून कारवाई न झाल्यास स्वतःला गाडून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सचिन पाटील, अनंत निकम, कैलास पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांनी २६ रोजी सकाळी स्वतःला मातीत गाडून घेतले होते. तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी दोघांनी दोन आठवड्यात शेड नेट घोटाळ्याची चौकशी करून गुन्हे दाखल केले जातील, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
प्रतिक्रिया…
संबंधित तक्रारदार हे सातत्याने राजकीय वैमनस्यातून माझ्या विरोधात अनेक बेकायदेशीर तक्रारी करीत असतात. शेडनेटच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप व शेडनेट विकल्या बाबतच्या आरोपात संबंधित तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीनुसारच ज्या शेतकऱ्यांनी शेडनेट विकून टाकले आहेत अशा लाभार्थ्यांकडून दिलेले अनुदान आता वसूल करण्याची कार्यवाही शासनाने सुरू केल्यामुळेच तक्रारदार व संबंधित काही लाभार्थी यांनी चिडून मला व माझ्या माध्यमातून आमचे नेते नामदार अनिलदादा पाटील यांना टारगेट केले आहे. विकास कामांच्या धडाक्यामुळे ना.अनिल दादा यांच्यापासून दुरावलेल्या हताश विरोधकांची ही राजकीय स्टंटबाजी आहे हे जनतेला माहीत झालेले आहे. सदरच्या प्रकरणात आम्ही प्रशासनाला वाटेल त्यावेळी सर्व प्रकारचे सहकार्य आम्ही करीत आहोत.
– अशोक आधार पाटील, सभापती कृ.उ.बा समिती
Related Stories
December 22, 2024