आकर्षक चित्ररथातून पारंपारिक वेशभूषा परिधान करत विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग…
अमळनेर:- पूज्य साने गुरुजी यांच्या पावन पद स्पर्शाने पावित्र्य झालेल्या अमळनेर शहरातील संत सखाराम महाराज वाडी संस्थानपासून ग्रंथदिंडीपासून ९७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली.अखिल भारतीय साहित्य मंडळाचे मराठी वाडमय मंडळ आयोजित संमेलनाच्या अनुषंगाने अमळनेरवासीयांचा उत्साह ओसांडून वाहत होता.
सकाळी ७:३० वाजता अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा ताबे व जैन उद्योग समूहांचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते दिंडीचे विधिवत पूजन करण्यात आले.वाडी चौक, दगडी दरवाजा,राणी लक्ष्मीबाई चौक, सुभाष चौक,छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मार्गे ग्रंथ दिंडी सकाळी १०:३०ला संमेलनस्थळी पोहचली.यावेळी दिंडी सोबत आकर्षक चित्ररथातून विविध पारंपारिक वेशभूषा परिधान करून आलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांचे रूप साकारून दिंडीत सहभाग नोंदवला होता.तर पारंपारिक वेशभूषा करून लोककलावंतांनी दिंडीत भाग घेतला होता.तर दिंडीसोबत शंखनाद पथक, शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे, अशोक जैन,तसेच राज्यातून आलेल्या नामवंत साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडी काढण्यात आली.यावेळी परिसरातील नागरिकांनी ग्रंथ दिंडीवर फुलांचा वर्षाव करून ग्रंथदिंडीचे स्वागत केले.