वित्त मंत्री अजित पवार यांची शिक्षकांच्या शिष्टमंडळाला माहिती…
अमळनेर:- १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या विना अनुदानित व अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वित्त विभाग व सामान्य प्रशासन विभागाला आदेश दिले असून त्यावर चर्चा सुरू आहे, असे उपमुख्यमंत्री व वित्त नियोजन मंत्री अजित पवार यांनी शिक्षकांच्या शिष्टमंडळाला सांगितले.
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अजित पवार हेलिकॉप्टरने क्रीडा संकुलात उतरले असता तालुका क्रीडा संकुलाच्या उर्वरित कामाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी शिक्षकांनी निवेदन दिले. २००५ पूर्वी जाहिरात काढून नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केले. मात्र २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित कर्मचाऱ्यांना पेन्शन का नाही, असा सवाल करीत शासन एकाच वेळी नियुक्त समान काम कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करून अन्याय करीत असल्याने नैसर्गिक न्याय तत्वावर न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. २ रोजी सकाळी क्रीडा संकुलाच्या उर्वरित ३ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन ना. अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या सहयोगातून अमळनेर तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धांच्या नामदार चषकाच्या बक्षिसांचे अनावरन देखील पवार यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र शासनाच्या निर्णयानुसार देशाच्या बांधणीसाठी घाम गाळणारे मजूर विजय भिल, बापूजी भिल, विनोद धनगर, लखन भिल, राजेंद्र माळी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ना. गुलाबराव पाटील, ना. दीपक केसरकर, ना. अनिल पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, क्रीडा समन्वयक सुनील वाघ, प्रा. अमृत अग्रवाल, महेश माळी,निलेश विसपुते हजर होते. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.