विकासाचे व्हिजन नसलेल्या माजी आमदारांच्या काळातच वर्षभर बंद होते धरणाचे काम,
अमळनेर:- अमळनेर तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकऱ्यासाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या प्रकल्पाला पांढरा हत्ती म्हणून हीनवणाऱ्यांना माजी आमदारांना विकासाचे व्हिजन नसल्याचे गावागावात बोलले जात आहे.
तब्बल साडेचार वर्ष गायब झाल्यानंतर परत आलेल्या माजी आमदार शिरीष चौधरी यांनी जोरात प्रचाराला सुरुवात केली. मात्र त्यांच्या कार्यकाळात रखडलेल्या विकासकामांचा पाढा आता जनताच वाचू लागली आहे.
तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या कार्यकुशलतेने तब्बल सहा कोटी इतका निधी २०१६-१७ साली अर्थसंकल्पात मिळाल्याने वर्षभर ह्या धरणाचे काम बंद होते. त्यानंतर केंद्र शासनाकडून निधी आणतो असे गाजर तालुक्याच्या जनतेला दाखवले, मात्र केंद्र शासनाने ही हात झटकून त्यांच्या आशेवर पाणी फिरवले. कोणत्याच बाजूने काम होत नाही म्हटल्यावर निराश झालेल्या मा.आ. चौधरी यांनी ह्या प्रकल्पाला पांढरा हत्ती संबोधत हा हत्ती किती दिवस पोसायचा ? असे जाहीरपणे मारवड येथे विकासोच्या प्रांगणात सांगितले होते.
पाडळसरे प्रश्नी निराशा झालेल्या शिरीष चौधरी यांना लहान मोठे सिंचन प्रकल्पाचा ही पाठपुरावा करता आला नाही. २०१७-१८ मध्ये निधी मंजूर होऊन पांझरा माळण नदीजोड प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेने त्याचा अहवाल सादर करण्यात आला नाही, त्यामूळे ते काम ही रखडले.
आपल्या कार्यकाळात कोणताही उल्लेखनीय कार्य करता न आल्याने पराभव झाला. त्यामुळे यंदा त्यांनी जनतेपुढे कोणतेही व्हिजन मिशन सादर केले नाही किंवा कोणतेही आश्वासन दिलेले नाही. बिनबुडाच्या मुद्द्यावर वाद घालून चर्चेत राहण्याचे काम माजी आमदार करीत असले तरी जनतेला सर्व ठाऊक आहे, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.