बारीपाड्याचे सुपुत्र चैत्राम पवार यांची मुलाखत….
अमळनेर:- कोणत्याही गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर संपूर्ण गावाने संघटितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. सामूहिक प्रयत्नातूनच गावाचा विकास शक्य आहे, असे मत बारीपाडा गावाचे सुपुत्र चैत्राम पवार यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ अमळनेरद्वारा आयोजित 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘ग्रामीण विकासाचे अर्थकारण व नियोजन’ या विषयावर चैत्राम पवार यांची मुलाखत झाली.
सभामंडप क्रमांक दोनमध्ये ही मुलाखत झाली. ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत घासकडबी यांनी ही मुलाखत घेतली.
धुळे जिल्ह्यातील बारीपाडा या 300 घरांची वस्ती असलेल्या गावाचा चैत्राम पवार यांनी सर्वांगीण विकास केला आहे. ग्रामीण विकासाचे अर्थकारण व नियोजन हा विषय साहित्याशी संबंधित नसला तरी समाजाशी संबंधित आहे म्हणूनच घेतला आहे, असे मुलाखतकाराने आधीच स्पष्ट केले.
वृक्षतोड करणाऱ्यांना दंड…
चैत्राम पवार म्हणाले, जंगल, जल, जमीन, जन व जानवर ही पंचसूत्री स्वीकारून गावाचा विकास करण्याला प्राधान्य दिले आहे, असे चैत्राम पवार म्हणाले. गावात आधी व्यसन तसेच वृक्षतोडीचे प्रमाण जास्त होते, ही बाब लक्षात घेऊन गावाच्या गरजा काय आहेत, हे आधी पाहिले. नांदेडचे एक डॉक्टर बारीपाडा गावात आले आणि त्यांनी वनवासी कल्याणाश्रमाचे आरोग्य केंद्र गावात सुरू केले. एवढ्या लांबून येऊन एखादा माणूस गावाचे आरोग्य जपण्यासाठी येतो, तर मग आपण गावातच गावाचा विकास कसा करू शकत नाही, ही बाब ध्यानात घेतली. गावातील वनांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही गावकऱ्यांसोबत एकत्र बसून काही नियम केले. कोणी झाडे तोडताना आढळल्यास त्याला दंड करणे, तो कोणीही असो. अशाच एका प्रसंगात वनविभागाच्या कर्मचाऱ्याने वृक्षतोड केली. तेव्हा त्यालाही चार हजार रुपये दंड केला. पकडून देणाऱ्यासही 501 रुपये बक्षीस जाहीर केले. वृक्षतोड बंद केल्यामुळे घरातील चूल कशी पेटवायची, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला, तेव्हा 20 वर्षांपूर्वी एलपीजी गॅस आणला. यानंतर आयआयटी पवई येथून सौर उर्जेवरचे कुकर विकसीत केले. तसेच गावात धूरविरहीत चूलही विकसीत केली. गावात आजही चार प्रकारच्या चुली आहेत.
वनसंवर्धनासाठी 2003 मध्ये आंतरराष्ट्रीत पातळीवरील पुरस्कार मिळाला. शासकीय योजनांच्या मागे न पळता, आम्ही गावाचा विकास केला. वनसंवर्धन करताना झाडांना कोणतीही हानी पोहोचू दिली नाही. मोहाची फुले वेचताना खाली वाकावे लागते. यातून कंबरेला त्रास होतो. म्हणून मोहाच्या झाडांना नेट लावले.
कोंबडी एकप्रकारे ‘एटीएम’च
पारंपरिक शेतीच्या पलीकडे शेती सुधार प्रकल्प गावात राबविला. नगदी पिकांऐवजी दैनंदिन गरजा भागविणाऱ्या पिकांवर भर दिला. बारीपाड्यातील शेतीवर जर्मनीतील एका प्राध्यापकाने पीएच.डी. केली आहे. शेती उत्पन्नातून पुढे शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन केली. पारंपरिक बियाणे बाहेरुन मागविण्यापेक्षा स्थानिक बियाण्यांवर भर दिला. पशुपालनालाही प्राधान्य दिले आहे. कोंबडी आमच्या दृष्टीने ‘एटीएम’ आहे. एक कोंबडी बाजारात नेली तर ती विकून 500-600 रुपये मिळतात.
अनियमित शिक्षकालाही केला दंड…
गावात शाळा होती. पण शिक्षक कधी तरी 15 दिवसातून एक वेळा यायचे. ही बाब गावकऱ्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी या शिक्षकाला जाब विचारला, तेव्हा विद्यार्थी येत नाही, असे या शिक्षकाचे म्हणणे होते. नंतर या शिक्षकालाही दंड केला.
बारीपाडा आज इतर गावांना पुरवतेय पाणी…
1100 एकरमध्ये वनसंवर्धनाचे काम झाले आहे. श्रमदानातून ग्रामस्थांनी 485 वनबंधारे बांधले. यातून परिसरातील शेतीला लाभ होतोय. एकेकाळी पाणीटंचाईचा सामना करणारे बारीपाडा गाव आज परिसरातील पाच गावांना पाणीपुरवठा करते. पावसाळ्यात 7.8 फुटांवर विहिरींना पाणी असते, तर इतर वेळेस 15-20 फुटांवर पाणी असते.
शाश्वत विकास करायचा असेल तर घरात वर्षभराचा अन्नसाठा पाहिजे. जैवविविधतेसाठी वनभाजी महोत्सवाचे आयोजन केले जाते. 18 वर्षांपासून हे हा महोत्सव सुरू आहे. आताच्या वनभाजी महोत्सवात 218 महिलांनी नावे नोंदणी केली आहे. यात 110 वनभाज्या होत्या. गावात स्त्री-पुरुष समानता आहे. गावात एकही कुटुंब भूमीहिन नाही. गावातील प्रश्न गावातच सोडवले जातात.
आपण ज्या गावात राहतो, त्या गावासाठी आपण काय करू शकतो, याचा आजच्या युवकांनी विचार केला पाहिजे, असा सल्ला चैत्राम पवार यांनी युवकांना दिला.