विद्रोही साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला मंडप खचून भरला…
अमळनेर:- विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला मंडप खचून भरला. पूर्वसंध्याला आयोजित परिवर्तन निर्मित “नली” नाट्य प्रयोगाला हजारो रसिक श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. विशेषतः महिला युवक युवतींची संख्या लक्षणीय होती.
परिवर्तन जळगाव या संस्थेने या नाट्य प्रयोगाची निर्मिती केली असून साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित श्रीकांत देशमुख यांच्या नलिनी देवराव या व्यक्तिचित्राचं नाट्यरूपांतर म्हणजे “नली” हे एकलनाट्य आहे. या नाट्यप्रयोगात अबोध मनातील प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या समोर येत असतांना गावखेड्यातल्या महिलांचं जगणं, ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न, जातीव्यवस्थेतील महिलांचं स्थान, गावगाड्यातील सामाजिक संरचना तसेच खेड्यातली कुटुंबव्यवस्था, शिक्षण आणि शेती संस्कृतीतील अनेक प्रश्नांवर ह्या एकलनाट्याने भाष्य करत प्रेक्षकांना खिळवून ठेवलं.
मूळ लेखक श्रीकांत देशमुख नाट्य रूपांतर शंभू पाटील यांनी केले. कलावंत हर्षल पाटील यांनी लक्षवेधी प्रमुख भूमिका साकारली. दिग्दर्शक योगेश पाटील, पार्श्वसंगीत मंगेश कुलकर्णी, प्रकाश योजना अक्षय नेहे, वेशभूषा मंजुषा भिडे, कविता वाचक स्वर नयना पाटकर, निर्मिती प्रमुख पुरुषोत्तम चौधरी, नारायण बाविस्कर यांचे सहकार्य लाभले.