प्रफुल्ल वानखेडे यांचे प्रतिपादन, कराडे गुरुजींच्या भाषणाच्या शैलीला जोरदार प्रतिसाद…
अमळनेर:- येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनातील आदिवासी क्रांतिवीर ख्वाजा नाईक सभा मंडपाच्या सत्यशोधक सावित्रीबाई फुले विचार मंचाचे उद्घाटन राजेंद्र कळसाईत यांच्या हस्ते झाले.यावेळी सभा मंडप श्रोत्यांनी खचून भरलेला होता.
याप्रसंगी महात्मा फुले यांच्या वेशातील विष्णू जोंधळे यांनी महात्मा फुले यांच्या पत्राचे वाचन केले. “गोष्ट पैशा पाण्याची” या पुस्तकाचे लेखक उद्योजक व लेखक प्रफुल्ल वानखेडे यांची पत्रकार व चेकमेट पुस्तकाचे लेखक सुधीर सूर्यवंशी यांनी मुलाखत घेतली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नितेश कराळे गुरुजी हे होते.
याप्रसंगी लेखक वानखेडे यांनी आर्थिक मूल्य व संस्कार कसे रुजावेत याविषयीची चर्चा उपस्थित प्रेक्षकांना खिळवून होती. कुठलाही उद्योग उभा करताना त्या उद्योगा विषयी संपूर्ण माहितीवर अगोदर काम करावं आणि मगच उद्योग उभारावा याविषयी सविस्तर माहिती दिली.तर सांगताना ‘लेट्स रीड इंडिया’ या उपक्रमाविषयी त्यांनी समाजाला विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त पुस्तक उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी मी अमळनेरच्या भूमीत शिकलेलो असल्याने येथील युवांना आर्थिक दृष्ट्या सबळ होण्याचे नवीन मार्ग मिळाले पाहिजे असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात सुप्रसिद्ध कराडे गुरुजी यांनी उपस्थितांना आर्थिक साक्षरतेवर मार्गदर्शन केले. कराडे गुरुजींच्या भाषणाच्या शैलीला उपस्थित त्यांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद दिला. प्रशांत निकम, डी डी पाटील, सतीश देशमुख यांनी स्वागत केलं.संयोजन समिती सदस्य प्रेमराज पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं. अजिंक्य चिखलोदकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.