बौद्धिक पर्वणीसोबत चविष्ट खान्देशी भोजनाचीही मेजवानी…
अमळनेर:- १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे दोन्ही भव्य सभामंडपात श्रोत्यांची प्रचंड उपस्थिती असून बैठक व्यवस्था अपूर्ण पडत असल्याने नागरिक खाली बसून वैचारिक साहित्य मेजवानीचा आनंद लुटत आहेत.
विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरलेला आहे.तर केकी मूस कला दालनातील भव्य चित्र प्रदर्शन, छायाचित्र व खान्देशी संस्कृती, आंबेडकरी चळवळ चित्र प्रदर्शन, ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र प्रदर्शनासह अनेक नामवंत कलाकार विविध कलेचे प्रकार प्रत्यक्ष सादर करत असल्याने कला प्रेमींची मोठ्या प्रमाणावर गर्दी या दालनात आहे. ग्रंथ दालनातील पुस्तक प्रदर्शनातही वाचकांची गर्दी उसळलेली दिसत असल्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी साहित्य रसिकांच्या व सामान्यजनांच्या गर्दीने फुलून गेलेले आहे.
चविष्ट खान्देशी भोजनाची मेजवानी…
विद्रोही मराठी साहित्य संमेलनात विविध तीन प्रकारच्या दालनात बौद्धिक मेजवानीची पर्वणी सुरू असतांना कृषी सम्राट बळीराजा अन्न शिवारातही चहा, नाश्ता व दोन वेळच्या चविष्ट खान्देशी भोजनाची मेजवानी विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजन समितीने उपलब्ध करून दिल्याने उपस्थित हजारो साहित्य प्रेमी, श्रोते, व नागरिकांनी अत्यंत समाधान व्यक्त केले आहे.