येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष भरारी घेणार असल्याचा मंत्री अनिल पाटीलांचा विश्वास…
अमळनेर:- निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह अजित पवार गटाला दिल्याचा निर्णय स्वागतार्ह असून यापुढे एक कार्यकर्ता म्हणून पक्षाला अजून बळकटी देण्यासाठी प्रयत्न करणार असून २०२४ मध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष भरारी घेणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील सांगितले.
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, पक्षातील एकाधिकारशाही मुळे २०१४-१५ पासून पक्षाला जी काही गळती लागलेली होती तसेच पक्ष संघटनेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जो असंतोष बघायला मिळत होता. त्या असंतोषामुळे जी काही पाऊले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उचलली गेली, ती उचलल्यानंतर निवडणूक आयोगासमोर दोन्ही पक्षकारांनी आपापली भूमिका त्या ठिकाणी मांडली त्यात प्रामुख्याने स्थानिक कार्यकर्ते,तालुका स्तरापासून तर राज्याच्या स्तरापर्यंत असलेले पक्षांतर्गत वेगवेगळे पदाधिकारी, तालुक्यातील कार्यकारिणीचे सदस्य, राज्यातले नेते,सोबतच आमदार, खासदार याचा बहुसंख्य पाठिंबा हा अजित पवारांना प्राप्त झाल्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असल्याचे त्यानी सांगितले. मागील काळामध्ये पक्षाला ओहोटी लागली होती, आता पक्षाची कमान अजित पवारांकडे आल्यामुळे पक्ष सोडून गेलेल्या लोकांसोबतच नवीन चेहऱ्यांना पक्षात सामावून घेतले जाईल. पक्ष मजबूत स्थितीमध्ये येईल यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच नवीन पिढीला,नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांना ,तसेच तरुण चेहऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये संधी प्राप्त होऊ शकते. ज्या ठिकाणी कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत नव्हता किंवा त्या पद्धतीची संधी मिळत नव्हती अशा मतदारसंघाचा सर्वे करून तिन्ही पक्षांबरोबर महायुतीमध्ये काही नवीन कार्यकर्त्यांना संधी प्राप्त करून दिली जाणार आहे.त्यातून कार्यक्रत्यांमध्ये एक नवी उमेद जागृत करून त्या उमेदीच्या बळावरती, कार्यकर्त्यांच्या प्रेरणेमुळे आणि नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आकर्षण या सर्व गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळात बळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.