मुंगसे येथील घटना, अमळनेर पोलिसांत मारहाण व दंगलीचा गुन्हा दाखल…
अमळनेर:- जागा उठवण्यासाठी अर्ज फाटे करतो या संशयावरून एकाला चाकू व कुऱ्हाडीच्या दांड्याने व इतर दोघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मुंगसे येथे ६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.
मुंगसे येथील प्रदीप मच्छिंद्र कोळी घरात असतांना शेजारी राहणारा भरत मोतीलाल कोळी, मोतीलाल आधार कोळी, चुनीलाल आधार कोळी, प्रवीण भाऊलाल कोळी, गोपाळ प्रकाश कोळी, सोपान प्रकाश कोळी असे घरात आले आणि जागा खाली करायचे अर्ज फाटे देतो या कारणावरून सर्वांनी शिवीगाळ व लाथा बुक्क्यांनी मारहाण करत खाली पाडले. भरत याने धारदार चाकूने कानाच्या मागे वार केला तर मोतीलाल कोळी याने कुऱ्हाडीच्या उलट्या दांड्याने पायावर मारहाण करून पाय फ्रॅक्चर केला. त्यानंतर आई आशाबाई, पत्नी अश्विनी हे भांडण सोडवायला आले असता त्यांना देखील खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी गावातील लोक आवरायला आले. सहाही आरोपींनी जाता जाता जीवे मारण्याची धमकी दिली आणि टीव्हीला चाकूने ओरखडे केले तर पत्नी अश्विनीच्या गळ्यातील पोत तोडून नुकसान केले. अमळनेर पोलीस स्टेशनला मारहाण व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.