खान्देशातील सर्वात मोठी लेदरबॉल स्पर्धा,विजेत्या टीमला मिळणार 2 लाखांचे बक्षीस…
अमळनेर:- महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या सौजन्याने आज दि 10 फेब्रुवारी पासून अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयात नामदार चषक क्रिकेट स्पर्धा रंगणार असून ही खान्देशातील सर्वात मोठी अखिल भारतीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा ठरणार आहे.
या चषक स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे विजेत्या टीमला 2 लाखांचे प्रथम बक्षीस तर उपविजेत्या टीमला 1 लाखांचे दुसरे बक्षीस तसेच मॅन ऑफ द सिरीजला 11 हजारांचे बक्षिस व ट्रॉफी दिली जाणार आहे. अमळनेर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ही राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा होत असुन यानिमित्ताने राज्यभरातील नामांकित संघ आजपासून अमळनेर शहरात दाखल होणार आहे. आयोजकांनी स्पर्धेची जय्यत तयारी केली असून या चषकाच्या निमित्ताने आजपासून प्रताप महाविद्यालयाचे मैदान तरुणाई व क्रिकेट शौकीनानी हाऊसफुल्ल होणार आहे.आज दि. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मंत्री अनिल पाटील, माजी जि प सदस्या जयश्री अनिल पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होऊन लागलीच स्पर्धेस सुरुवात होणार आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या सर्व संघाची निवास व भोजन व्यवस्था आयोजकांनी केली आहे.
स्पर्धेसाठी रणजी खेळाडूही येणार…
या नामदार चषकाच्या निमित्ताने शशांक अत्तरदे,यश नायर यासारख्या रणजी खेळाडूंचा सहभाग असलेले नामांकित संघ देखील येणार असून याव्यतिरिक्त मुंबई,पुणे, सुरत, इंदोर येथील नामांकित संघही येणार आहेत. आज पहिल्या दिवशी संगमनेर येथील श्री श्री रवीशंकर क्लबचा अंडर 19 वर्ड कप मध्ये खेळत असलेल्या सचिन धस संघ दाखल होऊन मैदानात पहिली सलामी देणार आहे.
खेळास प्रोत्साहन देण्याची परंपरा कायम…
मंत्री अनिल पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मैदानी खेळ आणि खेळाडू यांना प्रोत्साहन देण्यासाठी अमळनेर शहरात राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेची परंपरा सुरू केली असून 50 हजारांपासून सुरू झालेले पहिले बक्षीस आता 2 लाखांपर्यंत पोहोचल्याने या नामदार चषकाची विशेष चर्चा संपुर्ण राज्यातील क्रिकेट वर्तुळात आहे. मंत्री अनिल पाटील स्वतः अनेक सामने पाहण्यासाठी थांबून खेळाडू आणि क्रीडा प्रेमी यांचा विश्वास वाढविणार आहेत.