जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पत्रकार परिषदेत माहिती…
अमळनेर:- विधानसभा मतदार संघात ३२० मतदान केंद्रे असून १६० ठिकाणी वेबकास्टिंग करून त्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत संगणकीकरण प्रक्रिया वाढवण्यात येऊन आठ प्रकारच्या सॉफ्टवेयर सिस्टीम ठेवण्यात येणार आहेत. अचूक निवडणूक घेणे हे शासनाचे धोरण आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदाच्या निवडणुकीत अंथरुणावर खिळलेल्या आणि ८० वर्षावरील असह्य मतदारांसाठी १२ ड चा अर्ज भरून त्यांच्या घरीच मतदान कक्ष उभारून मतदान करून घेतले जाणार आहे. मतदानाच्या चार दिवस आधी पथक जाऊन मतदाराच्या सोयीनुसार वेळेची निवड करून मतदानाच्या दिवशी त्या वेळी मतदान कक्ष तयार केला जाईल. मतदान केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी ५ कोटी १७ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहेत. यंदाची निवडणूक आढावा मुक्त घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकाला वेळीच योग्य प्रशिक्षण आणि कामाची जबाबदारी याची जाणीव करून दिली जाईल. कर्मचाऱ्यांच्या पूर्वतयारी बैठकीत ६८ प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. निवडणुकीपूर्वी संवेदनशील व्यक्ती ओळखा त्यांच्यावर त्याच्या क्षमतेनुसार कारवाई करा, अवैध धंद्यांवर कारवाई, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आदर्श आचार संहितेची जाणीव करून द्यावी. हद्दपार करण्यात येणाऱ्या गुन्हेगारांना मतदानपासून वंचित ठेवणार नाहीत. सकाळी मतदान करून त्यांना गावाबाहेर काढण्यात यावे असे नियोजन असून त्यासंदर्भात पोलिसांना सूचना देण्यात आल्याचेही प्रसाद यांनी सांगितले.
वाळू बाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सतत कारवाई केली जात आहे त्या द्वेषातून अधिकाऱ्यांना दमबाजी, हल्ले होत आहेत. जिल्ह्यात १५०० ट्रॅक्टर वाहनांना परवाने असून त्यापैकी ७५० ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हयातील सिमेंट विक्रीच्या प्रमाणानुसार जिल्हाला ७५ हजार ब्रास वाळूची आवश्यकता असताना जिल्ह्यात १ लाख ब्रासच्या वर वाळू विक्री होत आहे. ११८ घाट शोधले होते त्यात ६० घाटांवर वाळू उपलब्ध आहे. काहींची सुनावणी बाकी आहे काहींचे टेंडर काढले आहे. पर्यावरणाच्या नियमात बसून नागरिकांना अवैध वाळू ऐवजी वैध वाळू उपलब्ध करणे हे शासनाचे धोरण असल्याचेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले.