
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या वर्ग श्रेणी अ पशुवैद्यकीय दवाखान्यात बहुप्रतीक्षेतनंतर पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी मिळाल्याने पशुपालकांनी व ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले आहे. सदर मागणीसाठी भाजपाचे कार्यकर्ते घनश्याम पाटील यांनी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शामकांत पाटील व सहा. जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे अथक प्रयत्न केलेत.
येथील वर्ग अ श्रेणीत असलेला पशुवैद्यकीय दवाखाना जीर्ण अवस्थेत होता.निवासीसाठी सुविधा नसल्याने परिणामी त्याठिकाणी डॉक्टर व इतर कुणीच कर्मचारी वास्तव्यास नव्हते. त्यामुळे त्याठिकाणी कुणी डॉक्टर येण्यास तत्पर नव्हते. कायम डॉक्टरच नसल्याने इतर कर्मचारी सुद्धा उपस्थित नसायचे. यामुळे पशुधारकांना खूप त्रास व्हायचा परिणामी त्यांना खाजगी डॉक्टरांकडून गुरांचा उपचार करून घ्यावा लागत होता व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता.आठवड्यातून काही दिवस प्रभारी म्हणून मारवड पशुवैद्यकीय अधिकारी मुकेश पाटील ही कर्तव्यदक्ष जबाबदारी सांभाळत होते.पण कामाचा अधिक व्याप असल्याने त्यांना इकडे येणे शक्य होत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्कालीन सरपंच रेखा मोरे व ग्राम पंचायतीच्या सहकार्यातून जिल्हा परिषद सदस्या मीना पाटील यांच्याकडे नवीन पशुवैद्यकीय दवाखाना मंजुरीची मागणी केली. आणि मागणीची तत्परता बघत मीना पाटील यांनी सदर वास्तूसाठी निधी मंजूर करत जिल्ह्यातील सर्वात सुंदर व आकर्षक दर्जा असलेली वास्तू अवघ्या काही महिन्यांत पूर्ण करून ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिली. वास्तू तयार झाली पण वैद्यकीय अधिकारी नसल्याने दवाखाना ओस दिसत होता. म्हणून घनश्याम पाटील यांनी पशूसंवर्धन उपायुक्त डॉ.शामकांत पाटील व सहा.जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर बाविस्कर यांच्याकडे कायमस्वरूपी डॉक्टर मिळण्यासाठी तगादा लावून स्वतः पाठपुरावा केला.आणि त्यांच्या मागणीला यश येवून प्रशासनाने डॉ.रविंद्र गाडे हे नवीन वास्तूला कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी म्हणून उपलब्ध करून दिलेत. म्हणून ग्रामस्थांनी व शेतकरी बांधवांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.यावेळी डॉ.गाडे यांनी पातोंडा येऊन पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यभार घेत त्यांचा उपसरपंच नितीन पारधी, सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पाटील, किशोर मोरे, भूषण बिरारी, प्रकाश लांबोळे, एकनाथ बिरारी, डॉ.मुकेश पाटील, डॉ.चंद्रकांत लोहारे आदींनी त्यांचा यथोचित सत्कार केला.

