अमळनेर:- यंदाची खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक चांगलीच चर्चिली जात असताना कार्यकारी संचालक पदासाठी सहकार पॅनलचे उमेदवार असलेले विनम्र व मनमिळाऊ स्वभावाचे प्रभाकर शंकर कोठावदे उर्फ बापू यांना मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
अमळनेर शहरातील शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या काही मोजक्या यशस्वी लोकांमध्ये प्रभाकर कोठावदे यांचा समावेश होतो. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून गोड वाणी आणि हसतमुख स्वभावाने त्यांनी मोठा जनसंपर्क तयार केला आहे. तसेच व्यवसायात यशस्वी झाल्यानंतर समाजाचे व शहराचे आपण देणे लागतो या भावनेने अनेक सामाजिक कार्यात सहभागी होत सिंहाचा वाटा उचलला आहे. तसेच अडलेल्या नडलेल्यांना मदत केली आहे. वाणी समाजाचे कार्यालयाचे बांधकामात मदत केली तसेच आपल्या भागातील पाण्याची असणारी समस्या बोअरवेल करून दूर केली. अर्बन बँक, मंगलमूर्ती व आशापूरी पतसंस्था या ठिकाणी पदाधिकारी पदावर असताना सहकार क्षेत्रात अनेकांना मदतीचा हात दिला. तसेच बऱ्याचश्या लोकांचे बिझनेस उभारणी करण्यात मोठे योगदान बापूंनी दिले आहे. झेरॉक्स, प्रिंटिंग प्रेस तसेच मंगलमूर्ती डिजिटल या आपल्या व्यवसायाच्या वृध्दी बरोबरच शेतीवर ही त्याचे लक्ष असते. कीर्तन, आध्यात्मिक महोत्सव आयोजित करत त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात ही आपला वाटा उचलला आहे. शहरातील अनेकांसाठी बापू हे व्यावसायिक क्षेत्रातील आदर्श असून त्याच्या मार्गदर्शनाने अनेकांची यशस्वी वाटचाल सुरू आहे. आगामी काळात खा. शि. मंडळाच्या माध्यमातून विविध व्यावसायिक अभ्यासक्रम आणून तरुणांना व्यवसायाकडे वळविण्याचे व्हिजन असल्याचे प्रभाकर कोठावदे यांनी अमळनेर २४×७ शी बोलताना सांगितले.
खाशिच्या निवडणुकीत अनेक उमेदवार उभे असून त्यात जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून प्रभाकर कोठावदे उर्फ बापू हे सर्वपरिचित आहेत. कधीकाळी खानदेशातील शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या अमळनेरचे व खान्देश शिक्षण मंडळाचे नावलौकिक जपण्याचा व पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचा ध्यास असल्याचे प्रभाकर कोठावदे हे नमूद करतात. आधी अपक्ष उमेदवार म्हणून असलेल्या बापू आता सहकार पॅनलमार्फत निवडणूक लढवत असून सहकार पॅनलने सत्ताधाऱ्यांच्या गैर कारभारविरोधात रान उठवले आहे. प्रभाकर कोठावदे यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांचा ही त्यांना भरघोस प्रतिसाद लाभत असल्याने बापूंचा विजय पक्का असल्याचे त्यांचे पाठीराखे सांगत आहेत.