
अमळनेर : २ जानेवारी – ‘पोलीस दिवस’ आणि ६ जानेवारी – ‘पत्रकार दिवस’ या दोन महत्त्वपूर्ण दिवसांचे औचित्य साधत अमळनेरमध्ये पोलिस व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचा सुंदर मेळ साधणारा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत तसेच पोलीस व पत्रकार यांचे कुटुंबियांमध्ये आपुलकीची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यामध्ये पोलिस व पत्रकार संघातील मान्यवरांच्या मुलांसाठी व विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा व लिंबू चमचा, तसेच पोलिस व पत्रकारांसाठी मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धा अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. याशिवाय शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजात मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
२ जानेवारी : पोलिस आणि पत्रकार संघातील सदस्यांसाठी मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धा होणार असून या स्पर्धेला दोन्हीकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
६ जानेवारी : निबंध स्पर्धा, महिलांची संगीत खुर्ची स्पर्धा तसेच पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार आणि विजेत्यांचा गौरव करून कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.
या उपक्रमातून समाजातील भिन्न घटकांना एकत्र आणत परस्पर सहकार्य, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी दृढ करण्याचा प्रयत्न आयोजकांतर्फे केला जात आहे. शहरात या संयुक्त उपक्रमांची उत्सुकता असून २ व ६ जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

