
अमळनेर – अमळनेर धुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला नो पार्किंग झोन मध्ये वाहने पार्किंग होत असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत, या पार्किंगमुळे फुटपाथ रस्त्याचाही वापर पादचाऱ्याना करता येत नाही. त्यामुळे फुटपाथवर अतिक्रमण वाढू लागले आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरात कचेरी ते पाच पावली मंदिरा पर्यंत बनवलेल्या फुटपाथ तर तिरंगा चौक रस्त्यासमोर वाहने पार्किंग होत असल्याने पादचार्याना या रस्त्याचा वापर करता येत नाही, बर्याच ठिकाणी नो पार्किंग ची बोर्ड लावली आहेत. तरी
वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे पायी चालणाऱ्या व्यक्तींना रस्त्याने चालत जावे लागते. यामुळे अनेकदा छोटे मोठे अपघात घडतात. बसस्टॅन्ड ते स्वामी समर्थ मंदिराचे गेट, गेट ते अंबर हॉटेल पर्यंत अनेक मोटार सायकली आणि इतर छोटे वाहने पार्किंग केलेली असतात. वाहनावर पोलिसांनी कारवाई केल्यास फुटपाथ रस्ता पादचाऱ्यांसाठी मोकळा होईल. वयोवृद्ध व्यक्तींना याचा लाभ होईल.
वाहतूक शाखेचे कर्मचारी पुन्हा दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे बेधडक वाहने लावली जात आहेत. ना वाहतूक शाखेचे कर्मचारी दंड आकारत ना वाहने जमा करण्याची कारवाई करत यामुळे वाहनधारकदेखील निर्ढावले आहेत.
खाजगी वाहतूक करणारे वाहनचालक देखील चक्क रस्त्यावर वाहने उभी करत बेधडक प्रवाशी भरत आहेत. विशेष करून बसस्थानक परिसरात हा गोंधळ मोठा होतो. कर्मचारी कानाडोळा करतात. नो पार्किंग झोन चे फलक केवळ नावालाच उरले आहेत.
प्रतिक्रिया…
चार वाहतूक पोलीस शहरात असून बेशिस्त पार्किंगवर कडक कारवाई व हातगाडी चालकांवर देखील कारवाई केली जाईल – दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक

