
अमळनेर : तालुक्यात उष्णतेमुळे चार जणांचा आणि एकाचा गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

तालुक्यातील एकतास येथील विश्वास नारायण पाटील वय ४४ यांनी दुपारी शेतात काम करून भर उन्हात ते घरी आले आणि लागलीच पाणी पिऊन कुलरसमोर बसले. त्यांना अचानक झटका आला आणि उलट्या झाल्या. उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉ. शिंदे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी , दोन मुले असा परिवार आहे.
निमगूळ ता शिंदखेडा येथील सिंधुबाई रमेश बागुल (वय ६९) ही महिला रेल्वेने भाच्याच्या मुलाच्या मेहंदीच्या कार्यक्रमासाठी अमळनेर येत असताना सायंकाळी सव्वा सहा वाजता एलआयसीचे अधिकारी आर बी पाटील हे स्टेशनवर फिरायला गेले असता महिला बेशुद्धवस्थेत आढळून आली. ती श्वास घेताना धापा टाकत होती. आर बी पाटील यांनी तिला रिक्षामध्ये टाकून ग्रामीण रुग्णालयात आणले डॉ आशिष पाटील यांनी तिला तपासले असता तिला मृत घोषित केले. महिलेला प्रचंड ताप होता त्यामुळे तिचा मृत्यू उष्णतेने झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली. महिलेच्या पश्चात मुलगा ,सून ,मुलगी ,नातवंडे असा परिवार आहे.
तर तालुक्यातील देवगाव देवळी येथील अनिल मंगल शिरसाठ वय ३५ याने स्वतःच्या राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याच्या पश्चात आई , पत्नी ,एक मुलगा , तीन मुली असा परिवार आहे.
दरम्यान एलआयसी कॉलनीतील रहिवासी रमेश जगन्नाथ चौधरी हे देखील उन्हात लग्नाला गेल्यानंतर आजारी पडले आणि आजारपणात त्यांचा मृत्यू झाला. तर ढेकू येथील शंकर आनंदा पाटील यांचा देखील उष्णतेने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.




