बसस्थानकासमोरील व बाजारपेठेतील रस्त्यावरील काढले अतिक्रमण…
अमळनेर:- शहरातील बसस्थानकासमोरील धुळे चोपडा रस्त्यावरील अतिक्रमणे व बाजारपेठेतील अतिक्रमणे काढल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
राज्य महामार्ग १५ वर अतिक्रमण, हातगाड्या, अवैध प्रवासी वाहने यांच्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन प्रवाश्यांना तसेच नागरिकांना त्रास होत होता. म्हणून मुख्याधिकारी तुषार नेरकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्यासोबत संयुक्त कारवाई करत जेसीबी मशीनने बसस्थानकासमोरील दुकानदारांचे अतिक्रमित ओटे , पत्र्याचे शेड,टपऱ्या, अतिक्रमणे काढून टाकली.
तिरंगा चौक, पाचपावली मंदिर, पैलाड भागातुन पुल, अण्णाभाऊ साठे चौक, महाराणा प्रताप चौक, स्वामी समर्थ चौक, बसस्टँड आदी ठिकाणी विक्रेते रस्त्यात व्यवसाय करू लागल्याने ग्राहकांच्या मोटरसायकली रस्त्यावर उभ्या राहतात. बसस्थानकाजवळ टॅक्सी व रिक्षा चालकांच्या नियोजित जागे व्यतिरिक्त काही अवैध प्रवासी वाहने, फळ विक्रेते दोन्ही बाजूला उभे राहत असल्याने देखील वाहतुकीची कोंडी होते. बसस्थानक चौक , स्वामी समर्थ मंदिर चौक परिसरात शाळा सुटताना व भरताना कोंडी होऊन मुलामुलींना सायकल काढणे देखील त्रासदायक होते. किरकोळ धक्का, अपघात यामुळे वाद होतात.
नगरपालिका ते पाचपावली देवी मंदिर रस्त्यावर मुख्य बाजारात देखील काही दुकानदारांनी व्यापारी संकुल सोडून बाहेर हातगाड्या व शेड वाढवले होते. त्यामुळे ग्राहकांना मोटरसायकल नेणे ही अवघड होते. तर काही दुकानदारांनी किरकोळ विक्रेत्यांना दुकानाबाहेरील रस्त्यावरील जागा भाड्याने दिल्याचे समजते. म्हणून वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेत किरकोळ अतिक्रमणे काढली आहेत.
प्रतिक्रिया…
सुरुवातीला सक्त ताकीद देण्यात आली आहे. वाहतुकीला अडथळे अथवा रस्त्यात अडथळे निर्माण करणाऱ्यांचे साहित्य जमा करून कारवाई केली जाईल.
–विकास देवरे, पोलीस निरीक्षक, अमळनेर
प्रतिक्रिया…
शहरातील सर्वच रस्त्यावरील टपरी धारक व अतिक्रमण धारकांना सुरुवातीला सूचना दिल्या जातील. त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे नंतर कारवाई केली जाईल.
– तुषार नेरकर, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद