अमळनेर:- तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत वय ३५ याने ९ रोजी पहाटे अमळनेर पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
मारवड हद्दीतील डांगरी येथे आधी बकरी चोरी प्रकरणात घनश्याम यास अटक करण्यात आली होती. व लागलीच त्याला डांगरी करणखेडे शिवारात तार चोरी प्रकरणात अटक करण्यात आली होती. घनश्याम हा चोपडा तालुक्यातील दोंडवाडे येथील मूळ रहिवासी होता. तो हल्ली अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील त्याच्या सासुरवाडीला राहत होता. त्याला ९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मारवड येथे लॉकअप सुविधा नसल्याने त्याला अमळनेर पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये ठेवण्यात आले होते. ९ रोजी सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान तो शौचालयाला गेला असता त्याने पांघरण्यास दिलेल्या रग फाडून जाड पट्टीने शौचालयाच्या खिडकीला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ आरोपी बाहेर आला नाही म्हणून गार्ड वरील पोलिसांच्या लक्षात आल्याने त्यांनी ताबडतोब त्याला खाली उतरवून वरिष्ठ अधिकारी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक , पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख यांना बोलावून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
घटनेचे वृत्त कळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, एलसीबी पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी भेटी दिल्या. न्यायाधीश स्वाती जोंधळे यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. त्यांनतर शव जळगाव येथे तीन डॉक्टरांच्या पॅनल समोर शव विच्छेदन करण्यात येणार आहे. मयताच्या नातेवाईकांना कळवण्यात आले आहे. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.