
तब्बल १७ लाखाचा मुद्देमाल केला जप्त, दोन जण पोलिसांच्या ताब्यात…
अमळनेर:- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल गुटख्याची मध्यप्रदेशातून वाहतूक करणाऱ्या वाहनावर अमळनेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर जळोद ता.अमळनेर येथे सापळा रचून कारवाई केली असून त्यात १७ लाख ३२ हजार रुपयाचा विमल गुटखा व इतर मुद्देमाल २९ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जप्त करण्यात आला असून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर,पोलीस निरीक्षक विकास देवरे,सहायक पोलीस निरीक्षक अजित सावळे यांना मध्य प्रदेशातून विमल गुटखा वाहतूक करणारे वाहन जळोद मार्गे अमळनेर कडे जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहीतीच्या आधारावर पोलीस कॉन्स्टेबल हितेश बेहरे, जयंत सपकाळे,गणेश पाटील, हर्षल पाटील,निलेश मोरे,पोलीस नाईक बागडे,तसेच दोन पंच यांच्या समवेत जळोद गावाजवळील दरवाज्याजवळ सापळा लावला असता दि.२९ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हातेडकडून अमळगावकडे जाणारी महिंद्रा पिक अप (एम एच ०१ डी आर ११०८) हि गाडी सापळा लावलेल्या पथकाने थांबविली. व चालकाला विचारपूस केली असता त्याने मध्य प्रदेशातील एका शेतातून विमल गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती दिली.त्यानुसार पथकाने वाहनाची तपासणी केली असता वाहनात ७ लाख ७७ हजार रुपयाचा ४ निळ्या गोणीतील विमल गुटखा,१ लाख ४२ हजार रुपयाचा ५ पांढऱ्या गोनीतील विमल गुटखा,८ लाख रुपये किमतीची महिंद्रा पिक अप वाहन, ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १७ लाख ३२ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जमा करण्यात आला असून हितेश बेहरे यांच्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिसांत भादवि कलम ३२८, १८८, २७२,२७३,३४ प्रमाणे वाहन चालक छोटू रमेश भिल,व क्लीनर सुनील आसाराम भिल रा.हेंकळवाडी ता.जि.धुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अजित सावळे करीत आहेत.

