अंदाजपत्रकानुसार कामे नाहीत, ग्रामस्थांचा उपोषणास बसण्याचा इशारा…
अमळनेर:- तालुक्यातील ढेकू येथील जलजीवन मिशन अंतर्गत झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. यासंदर्भात चार तक्रारी करूनही दखल घेण्यात आली नाही म्हणून ग्रामस्थांनी ६ मे पासून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
तालुक्यातील ढेकू येथे १ कोटी ५३ लाख १ हजार ८९५ रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. मात्र ठेकेदाराने ती कामे अंदाजपत्रकानुसार केलेली नाहीत. विहिर ७० फूट अपेक्षित असतांना ६० फूट केली आहे. निसर्डी धरणापासून ते ढेकू गावापर्यंत असलेली पाईप लाईन ६ इंची अपेक्षित असताना ती फक्त ४ इंची टाकण्यात आली आहे. पाईप लाईन साडे तीन ते चार फूट खोल हवी असताना फक्त अडीच फूट खोलवर टाकण्यात आली आहे. अंदाजपत्रकानुसार कामे केली नसल्याने ठेकेदाराने ती कमी खर्चात केली आहेत अशा आशयाच्या तक्रारी भूषण विश्वास पाटील, लहू संतोष पाटील, मिठाराम मोतीराम पाटील,निलेश अशोक पाटील यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे फेब्रुवारीत दोनदा, मार्च महिन्यात व एप्रिल महिन्यात एकदा अशा चार वेळेस केल्या आहेत. मात्र संबंधित अभियंता तक्रारींची दखल घेत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.