विजेत्यांना सुवर्ण, रजत आणि कांस्य प्रमाणपत्रांचे करणार वाटप…
अमळनेर:- लोकसभा निवडणुकीत अमळनेर तालुक्यातील मतदानाची टक्केवारी वाढून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी पालिका प्रशासनामार्फत मतदान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रथम येणाऱ्या स्पर्धकांना सुवर्ण प्रमाणपत्र, द्वितीय येणाऱ्यास रजत प्रमाणपत्र तर तृतीय येणाऱ्यास कांस्य प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवून मतदारांची जनजागृती करीत आहे.यासाठी अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरस्तरीय मतदान स्पर्धा चे आयोजन करण्यात आले असून त्यात शहरातील गणपती,दुर्गा उत्सव मंडळ,सार्वजनिक व्यायाम शाळा,सामाजिक संस्था,विविध क्लब,गट,रहिवासी कॉलनी संघ, व कमीत कमी १०० सदस्य असलेल्या संस्था या स्पर्धेत भाग घेऊ शकणार असून आपल्या भागातील १०० टक्के मतदान झाल्यास त्यास प्रथम पारितोषिक सुवर्ण प्रमाणपत्र,95 ते 86 टक्के मतदान झाल्यास त्यास 75 गुण देऊन द्वितीय रजत प्रमाणपत्र,व 85 टक्के मतदान झाल्यास त्यास 50 गुण देऊन तृतीय कांस्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गुगल लिंक पालिकेमार्फत देण्यात आली असून त्यावर दि.11 मे रोजी 5 वाजेपर्यंत माहिती भरायची असून 15 मे रोजी कागदपत्रे पडताळणी करण्यात येणार असून अधिक माहितीसाठी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, सभा लिपिक महेश जोशी,शहर समूह संघटक चंद्रकांत मुसळे आदींशी संपर्क करण्याचे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे.