श्री अंबरीश ऋषी महाराज टेकडी ग्रुपचा स्तुत्य उपक्रम…
अमळनेर:- श्री अंबरीश ऋषी महाराज टेकडीवर अनेक पिंपळाचे रोपांची लागवड झाली असताना काही विध्वंस प्रवृत्ती कडून ती तोडली गेल्याने त्या रोपांना प्लास्टर करून जगविण्याचा प्रयत्न श्री अंबरीश महाराज टेकडी ग्रुपने केला आहे.
विशेष म्हणजे ज्या प्रमाणे अपघातग्रस्त तथा जखमी व्यक्तीवर उपचार करतात त्याच प्रमाणे या तुटलेल्या रोपांना पुन्हा जोडण्यासाठी व्यवस्थित बँडेज करून त्यांच्या जखमा भरण्यात आल्याने ही रोप आता नक्कीच पुन्हा जगू आणि बहरू शकतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रत्यक्षात टेकडी ग्रुपने अहोरात्र परिश्रम घेऊन ओस असलेल्या या टेकडीवर वृक्षांचे नंदनवन साकारले असून त्यांची निगा व काळजी देखील टेकडी ग्रुपचे सदस्य घेत असतात,प्रचंड हिरवळीमुळे व्यायाम व फिरणाऱ्या लोकांसाठी हा पिकनिक स्पॉटच ठरला आहे. मात्र काही विध्वंस प्रवृत्तीच्या लोकांनी अनेकदा याठिकाणी आगी लावून साकारलेली हिरवळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र टेकडी ग्रुपने जराही मागे न हटता टेकडीला कायम फुलवित ठेवले आहे.आता काही दृष्ट लोकांनी छान बहरलेली पिंपळाची रोपेच तोडल्याने ग्रुप सदस्यांनी प्रचंड दुःख व्यक्त केले. मात्र केवळ दुःख व्यक्त करीत न बसता या रोपांना पुन्हा जीवदान देण्याचा चंग बांधून तसे उपचार केल्याने निश्चितपणे या ग्रुप सदस्यांच्या प्रयत्नांना यश येईलच असा विश्वास पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केला असून कुणाला मदत करणे शक्य नसेल तर किमान नासधूस तरी करू नका अशी कळकळीची विनंती टेकडी ग्रुप सदस्यांनी केली आहे.