पोलिसांत तिघांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल…
अमळनेर:- अल्पवयीन मुलीला बोलावून बळजबरीने प्रेम केले नाही तर भावाला काहीही करून टाकू अशी धमकी देणाऱ्या तिघांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील पिंपळी येथील सातवीत जाणारी १२ वर्षाची मुलगी २९ एप्रिल रोजी सायंकाळी साडे सात वाजता ओट्यावर बसलेली असताना भावेश हनुमंत महाजन वय १८, व इतर दोन विधी संघर्ष बालके हे तिघे गल्लीतून जात असतांना भावेशने तिला माझ्या मागे ये म्हणून बोलावले. मुलीने हा प्रकार आई वडिलांना सांगितल्याने वडिलांनी तिला त्यांच्यासोबत जायला सांगितले. मुलगी एकाच्या गोडाऊन जवळ गेली. तेव्हा भावेशने तिला, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो माझे प्रपोज ऍक्सेप्ट कर नाहीतर मी तुझ्या भावाला काहीही करेल’ अशी धमकी दिली. तेव्हा दोघा अल्पवयीन मुलांनी मुलीला सांगितले की, तू त्याचे प्रपोज ऍक्सेप्ट कर. मुलीच्या वडिलांनी हे ऐकल्यावर मुलीला घरी पाठवले तेव्हा तिघांनी मुलीच्या वडिलांशी वाद घातले. यापूर्वीही मुलगी शिव मंदिरात जात असताना तिघे मंदिरावर बसलेले असायचे म्हणून मुलीने मंदिरात जाणे बंद केले होते. मुलीच्या आईने फिर्याद दिल्यावरून तिघांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख करीत आहेत.