
पाणी पुरवठा योजनेचा मार्ग झाला मोकळा…
अमळनेर:- तालुक्यातील भरवस येथे गेल्या चार पाच वर्षांपासून गायरान जमिनीवर तसेच ग्रामपंचायतीच्या विहिरीवर केलेले अतिक्रमण ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात काढल्याने पाणी पुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

तालुक्यातील भरवस येथे ग्रामपंचायत गट क्रमांक २८२ व २८३ मध्ये एकाने अतिक्रमण करून त्याठिकाणी स्वतःची शेती करणे सुरू केले होते. तसेच ग्रामपंचायतीच्या विहिरीवर देखील ताबा बसवून त्यात मोटर टाकून उपयोग करून ग्रामपंचायतीला उपयोग करू देत नव्हता. सरपंच हिरा भिल, उपसरपंच प्रा डॉ संजय सोनवणे, ग्रामसेवक विनोद पाटील, आशाबाई मांग,छोट्याबाई मुसे, मंगेश पाटील,कविता पाटील, लताबाई पाटील, रामराव पाटील, ज्योती पाटील, सुनीता वानखेडे यांनी जिल्हाधिकारींकडे तक्रार केली. मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, सुनील आगोणे,सुनील तेली, संजय पाटील,सचिन निकम, संजय पाटील व जळगाव येथील दंगा काबू पथक यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढून शेती व विहीर मुक्त करण्यात आली. यामुळे पाणी पुरवठा योजनेचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.

