
चौघांवर अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद, २३ हजार ७००चा ऐवज लंपास…
अमळनेर : सुरतेहून संत सखाराम महाराज यात्रेसाठी आलेल्या दोघांना चार जणांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील मोबाईल व रोख असा २३ हजार ७०० रुपयांचा ऐवज हिसकावून घेतल्याची घटना २४ रोजी पहाटे १ वाजून १५ मिनिटांनी घडली.

निरंक उर्फ रोहित भगवान पाटील व कृष्णा भरत पाटील (दोन्ही रा दिंडोली सुरत) हे संत सखाराम महाराज यात्रेसाठी रेल्वेने २३ रोजी रात्री अमळनेर स्टेशनवर आले. बसस्थानकावर बस नसल्याने ते २४ रोजी पहाटे १:१५ वाजता बौद्ध मंदिराजवळ मुख्य रस्त्यावर उभे असताना एक जण मोटरसायकल (क्रमांक एम एच ५४ ए ३९३) वर येऊन दोघांना कुठे जायचे विचारू लागला. दोघांनी सडावण येथे जायचे सांगितल्याने त्याने मला पण सडावण जायचे असे सांगून दोघांना मोटरसायकलवर बसवले आणि मुख्य रस्त्याने न नेता गल्ली बोळातून डायमंड सिटी नावाच्या रस्त्याने मोकळ्या मैदानात नेले. तेथे आधीच तीन जण उभे होते. तेथे गेल्यावर त्यांनी चाकू काढून कृष्णाच्या पोटाला लावून जे असेल ते काढून द्या म्हणून धमकावू लागले. दोघांनी नकार दिल्यावर चौघांनी चापट,लाथा बुक्क्यांनी मारहाण करू लागले. दोघांच्या खिशातील मोबाईल आणि रोख रक्कम काढून पुन्हा अमळनेरात दिसायचे नाही म्हणून धमकी दिली. निरंकने अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साळवे करीत आहेत.