पूज्यपाद आचार्यदेव श्रीमद विजय रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. यांचे आज होणार आगमन..
अमळनेर:- अध्यात्म आणि सकारात्मक जीवनशैलीचा आपल्या प्रवचनातून खुलेपणाने उपदेश करणारे सरस्वतीलब्धप्रसाद, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित, जैनांचार्य, 465 पुस्तकांचे लेखक पूज्यपाद आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुन्दरसूरीश्वरजी महाराज यांचे सुमारे चाळीस संत- साध्वींसह आज दि 29 मे रोजी अमळनेर नगरीत आगमन होत आहे.
शहरात ज्ञानगंगेचा रत्नप्रवाह’ प्रवचन मालिकेतून दि 29 मे ते 13 जून पर्यंत ते ज्ञान देणार आहेत. आज दि.29 मे रोजी सकाळी 6 वाजता जळगाव मार्गावरून पदयात्रेद्वारे त्यांचा नगर प्रवेश होत असून त्यानंतर सराफ बाजारातील श्री गिरुवाजी पार्श्वनाथ जैन मंदिरातून वरघोडा मिरवणूक काढण्यात येणार आहे. सदर वरघोडा श्री दादावाडी मार्गे निघून न्यू प्लॉट भागातील श्री शितलनाथ मंदिरात समारोप होणार आहे.सदर मिरवणुकीत सकल जैन समाजाचे समस्त पुरुष बांधव आणि महिला भगिनी सहभागी होणार आहे.सकल जैन समाजाने वरघोडा व प्रवचन मालेची जय्यत तयारी केली आहे.
दरम्यान गुरू महाराज आज 29 पासून हॉटेल मिडटाऊन येथे दररोज सकाळी 9 ते 10 वाजेदरम्यान भाविकांना संबोधित करतील.पूज्यपाद संतश्री यांच्या श्रीमुखातून दि 13 जून पर्यंत 15 दिवस ‘रत्नप्रवाह’ प्रवचन मालिका होणार आहे. याठिकाणी भाविकांना बसण्याची प्रशस्त व्यवस्था असून संत-साध्वींकरिता व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.प्रवचनानंतर गुरू महाराज शितलनाथ मंदिरात भाविकांना आशीर्वाद व दर्शनाचा लाभ देणार आहेत अशी माहिती श्री सकल जैन संघाचे प्रसिद्धी प्रमुख कुमारपाल उर्फ बाळू कोठारी यांनी दिली आहे.
जीवन परिवर्तन करणाऱ्या या प्रवचनमालेत सर्व धर्मप्रेमी महानुभावाना निमंत्रित करण्यात आले असून एकदा प्रवचन ऐकल्यास पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी याल अशी गुरू देवांची ख्याती आहे.तरी सर्वानी या रत्न प्रवाह प्रवचन मालेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री सकल जैन संघ,अमळनेर यांनी केले आहे.