ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी…
अमळनेर:- प्रत्येक ग्रामपंचायतीला घनकचरा व्यवस्थापन करण्याच्या सूचना आहे. मात्र तालुक्यातील कावपिंप्री गावाच्या वेशीवर वस्ती समोर रस्त्यालगत कुंडी तयार करण्यात आली आहे. त्या कुंडीत परिसरात कचरा टाकला जात आहे. येथे ओल्या-सुक्या कचऱ्यासह सडलेले अन्न, प्लास्टिक आदींचा खच पडला असून दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे ग्रामपंचायतने लक्ष देण्याची गरज आहे.
कावपिंप्री गावात अनेक दिवसांपासून या गावाच्या वेशीवर मुख्य रस्ता लागत कचरा टाकला जातो. समोर वस्ती व परिसरात नागरिक राहत असतात तसेच आजूबाजूला बसण्यासाठी बाक आहे. लहान बालके तिथे खेळत असतात. तसेच हाकेच्या अंतरावर बस थांबा आहे. पुढील गावांत जाण्यासाठी मुख्य रस्ता असुन तेथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा खच पडल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते. उन्हाळा असल्याने वाऱ्यामुळे या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरील प्लास्टिक परिसरात उडत असल्याने नागरिकांच्या घरासमोर कचरा गोळा होतो. याबाबत नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात या कचऱ्यापासून अधिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करून कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावली अशी मागणी होत आहे.