कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना…
अमळनेर:- शेतकरी आपली देवता आहे, बियाणे व खते जास्त भावाने विकू नका, एका मालाला विकताना दुसऱ्या मालाची सक्ती लिंकिंग करू नका. शेतकऱ्यांना कापसात आंतरपीक घेण्याचे आवाहन करा अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या आढावा बैठकीत दिल्या.
पालिकेच्या सभागृहात कृषी निविष्ठा विक्रेत्यांची आढावा बैठक ३० रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. शेतकऱ्यांची उत्पादकता कशी वाढेल याकडे प्रामुख्याने लक्ष द्यायची गरज आहे. कापूस पिकात उडीद, तूर, मूग, सोयाबीन असे आंतरपीक घेण्यास सांगावे, खतांचा जास्त वापर करू नका. पाणी देखील आवश्यक तेव्हढेच द्यायला सांगा , माती परीक्षण वाढवावे, कृषी वितरकांनी बियाण्याचे प्रात्यक्षिक घेऊन शेतकऱ्यांना नमुना दाखवावा असे आवाहन आयुष प्रसाद यांनी केले. तर जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांनी सांगितले की, निविष्ठा विक्रेत्यांनी कायद्याच्या तरतुदींनुसारच विक्री करावी अन्यथा कारवाई करण्यात येईल , वरिष्ठ शास्रज्ञ हेमंत बाहेती यांनी बीजप्रक्रिया बाबत मार्गदर्शन केले. कृषिविकास अधिकारी सूरज जगताप यांनी कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे , तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार, पंचायत समिती कृषी अधिकारी कोते , कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाययक यांच्यासह तालुका संघटनेचे अध्यक्ष योगेश पवार, उपाध्यक्ष प्रशांत भदाणे, सचिव मुन्ना पारेख, खजिनदार विजय जैन, किरण पाटील,मगन पाटील, ललित ब्रह्मेचा,दीपक पाटील,रवी पाटील,प्रदीप कंखरे आदी उपस्थित होते.